कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी शिरोली परिसरात जमल्यामुळे किणी टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच बंगळूर आणि पुणे दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्त्याच्या कडेला ५ हजार शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. २३) सकाळपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोली (पु.) परिसरात चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. अद्याप आंदोलन शांततेत असून आंदोलन तीव्र करण्याची तयारी करण्याचा इशारा देऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मागण्या मान्य होईपर्यंत महामार्गावर मुक्काम ठोकण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी संध्याकाळी आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्याचे नियोजन सुरू आहे.