Mexico City News 
Latest

प्रश्न विमानप्रवास व्यवस्थापनाचा

Arun Patil

अलीकडच्या काळात विमानांमध्ये प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या वाढत्या घटना निश्चितच चिंतेचा विषय आहेत. हे लक्षात घेता, प्रवासादरम्यान लोकांच्या सन्माननीय वर्तनासाठीच्या नियमांचे महत्त्व समजू शकते. मात्र, हवाई सेवेच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरजही अनेक पातळ्यांवर जाणवत आहे.

कोणत्याही विमानात उड्डाण करण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान प्रवाशाने आक्रमक होण्याचे समर्थन करता येणार नाही. त्यासाठी नियमानुसार कारवाई केली जाते. परंतु, त्याच्या मुळाशी परिस्थितीजन्य किंवा व्यवस्थापनाशी संबंधित समस्या असल्यास, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी ते आवश्यक असू शकते. ही सर्व चर्चा करण्याचे कारण म्हणजे अलीकडेच दिल्ली विमानतळावर गोव्याला जाणार्‍या विमानाच्या उड्डाणाला सुमारे तेरा तास उशीर झाल्यामुळे एका प्रवाशाने संतप्त होऊन क्रू मेम्बरला मारहाण केल्याची घटना घडली. प्रवाशाचे असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह होऊ शकत नाही; पण परिस्थितीचा विचार करून असे प्रसंग उद्भवू नयेत, म्हणून अशा उपाययोजना करता येतील का, हा प्रश्न आहे.

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गावरील प्रवासाला विलंब होणे ही एक सामान्य परिस्थिती बनली आहे. विमानाचे सुरक्षित उड्डाण मुख्यत्वे हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असते आणि याबाबतीत किरकोळ निष्काळजीपणादेखील मोठा धोका निर्माण करू शकतो. फ्लाईट ऑपरेटरपासून सर्व क्रू मेम्बर्सपर्यंत, विमानाला त्याच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहोचण्याची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली, तर त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होण्याची शक्यता असते.

दुसरे म्हणजे, हवामानातील गडबडीसारख्या अनपेक्षित कारणांमुळे कोणत्याही जोखमीच्या वेळी, उड्डाणाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. त्यामुळे विमानाने प्रवास करणार्‍यांनी संयम बाळगायला हवा. यासंदर्भात विमानात वैमानिकाला मारहाण करणार्‍या प्रवाशाविरुद्ध कायद्यानुसार कारवाई होणे स्वाभाविक आहे. पण उड्डाणाला बराच विलंब झाल्यास, प्रवाशांना त्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत संयम ठेवता यावा म्हणून व्यवस्थापन पातळीवर काही करता आले असते का?

वृत्तानुसार, आरोपी प्रवाशाने तो बराच वेळ विमानात बसला होता आणि सध्या फ्लाईट शक्य नसल्याने त्याला जाण्याची परवानगी द्यावी, असे म्हणताना ऐकू आले. विमानाची संवेदनशील रचना आणि उड्डाणाचा धोका लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशी परवानगी देणे अवघड आहे. परंतु, आज तंत्रज्ञानाचा एवढा विकास झाला आहे, की हवामानाच्या स्थितीचा अंदाज अनेक तास किंवा एक किंवा दोन दिवस आगाऊ केले जाऊ शकतात. अंदाज बरोबर असल्यास प्रवाशांना खराब हवामान आणि उड्डाण विलंबाची माहिती देण्याच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, जेणेकरून लोक त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू शकतील.

लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवाई प्रवासादरम्यान असभ्यतेविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, व्यवस्थापन स्तरावर, अशा उपाययोजनांचा विचार केला जाऊ शकतो जेणेकरून उड्डाणाला बराच विलंब झाल्यास, प्रवाशांना आगाऊ माहिती देण्यासाठी एक व्यावहारिक यंत्रणा विकसित केली जाऊ शकते. गेल्या अनेक महिन्यांपासून विमानात गैरवर्तणुकीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रवासी काहीवेळा विमानातील कर्मचार्‍यांच्या अंगावर जाताना दिसत असतात, तर काही जण दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे दिसून येते. मारामारीचे प्रकारही घडले आहेत. यामध्ये नेमका दोष कोणाचा यावर विमानतळ प्रशासनाने देखरेख करण्याची गरज आहे. बर्‍याचवेळा प्रवाशाचा दोष असतोच असे नाही, काहीवेळा कर्मचारीही चुकीचे वागू शकतात, यावर मंथन करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT