Latest

आंतरराष्‍ट्रीय : जागतिक शांततेला पुतीनशाहीचे आव्हान

Arun Patil

रशियातील निवडणुका म्हणजे फार्स आहेत. एका हुकूमशहाने जगाची फसवणूक करण्यासाठी केलेले हे एक नाट्य आहे, अशा स्वरूपाच्या अनेक टीकाटिप्पणी पश्चिमी जगताने केल्या. परंतु या सर्वांपलीकडे जाऊन व्लादिमीर पुतीन यांची राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेली निवड ही जागतिक राजकारणावर परिणाम करणारी आहे हे निश्चित.

रशिया- युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि तरीही आजघडीला हे युद्ध संपण्याच्या कोणत्याही शक्यता दूरपर्यंत दिसत नाहीयेत. हे युद्ध एक महिनाभरापेक्षा जास्त काळ चालणार नाही, असे मत काही अभ्यासकांनी मांडले होते. पण 750 दिवसांहून अधिक काळ या दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष संघर्ष सुरू राहिलेला जगाने पाहिला. या युद्धामध्ये असंख्य लोक मारले गेले असून लाखो विस्थापित झाले आहेत. या युद्धाचा प्रसार होतो की काय, या भीतीने पश्चिम युरोपमधील देश आता नाटोकडे वळत आहेत. अलीकडेच स्वीडन या देशाने नाटोमध्ये सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि फिनलँडही त्याच वाटेवर आहे. या युद्धाचे भवितव्य रशियामध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बर्‍याच अंशी अवलंबून होते.

अमेरिकेसह जगभरातील अनेक जाणकारांनी या युद्धामुळे रशियाच्या अंतर्गत राजकारण-समाजकारणात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता कमालीची घटली असून त्यांच्याविषयीचा रोष प्रचंड वाढला आहे, अशी मांडणी केली होती. मध्यंतरीच्या काळात वॅगेनार ग्रुपने केलेल्या लष्करी बंडानंतर तर पुतीनशाहीचा अस्त जवळ आला, असे दावेही केले गेले; परंतु नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये तब्बल 87 टक्के मते मिळवत पुतीन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून आपल्या टीकाकारांना आणि विरोधकांना सणसणीत चपराक दिली आहे.

व्लादिमीर पुतीन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले असून यंदाचा विजय हा सलग तिसरा विजय आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये एकूण तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सुपडासाफ करून एकहाती विजय मिळवण्यात पुतीन यांना यश आले आहे. पुतीन हे सध्या 71 वर्षांचे आहेत. त्यांच्यापूर्वी तत्कालीन सोव्हिएत महासंघामध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम जोसेफ स्टॅलिन यांनी केला होता. आताचा कार्यकाळ पूर्ण केल्यास पुतीन हे स्टॅलिन यांचा विक्रम मोडीत काढतील. गेल्या 20 वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये जॉर्ज बुश ज्युनिअर, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि आताचे ज्यो बायडेन असे चार राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

भारताचा विचार करता अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी असे तीन पंतप्रधान झाले. पण याच 20 वर्षांच्या काळात रशियात केवळ एकच नाव केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे व्लादिमीर पुतीन. 25 वर्षांपूर्वी म्हणजे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतीन यांच्याकडे सोपवली होती. 2000 मध्ये पुतीन हे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतर 2008 पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहिल्यानंतर पुतीन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही. कारण रशियन राज्यघटनेमध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहू शकतो अशी तरतूद होती. त्यानुसार 2008 मध्ये त्यांची जागा मेदवेदेव यांनी घेतली. तथापि पुतीन 2008 ते 2012 या काळात रशियाचे पंतप्रधान बनले. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सत्तेचे केंद्रीकरण करणे आणि इतका प्रदीर्घ काळ सत्तेचा उपभोग घेणे हे व्लादिमीर पुतीन यांच्यासारख्या व्यक्तीलाच जमू शकते.

अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ज्याप्रमाणे जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारी असते; त्याचप्रमाणे रशियातील या निवडणुकीचेही जागतिक राजकारण-अर्थकारणावर परिणाम होत असतात. कारण 1945 ते 1990 हा शीतयुद्धाचा काळ होता. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर शीतयुद्धाची सांगता झाली आणि नव्वदीच्या दशकानंतर शीतयुद्धोत्तरकालीन जागतिक राजकारणाची सुरुवात झाली. या काळात रशियामध्ये पुन्हा एकदा पुनरुज्जीवनवादी प्रवाह जोर धरू लागला. रशियाचे गतवैभव, साम्राज्य आणि जागतिक राजकारणातील प्रभाव पुन्हा मिळवण्याचा विडा पुतीन यांनी उचलला. याचे मुख्य कारण ठरले नाटोचा विस्तार. स्वीडनच्या समावेशानंतर नाटो या संघटनेच्या सदस्य देशांची संख्या 32 झाली आहे. नाटोचा धोका लक्षात घेऊन पुतीन यांनी रशियाच्या पुनर्बांधणीवर भर दिला. यापूर्वी त्यांनी लष्करी सामर्थ्याच्या जोरावर क्रीमियाचे एकीकरण केले आणि दोन वर्षांपासून युक्रेनवर कब्जा मिळवण्यासाठी त्यांनी घनघोर युद्ध आरंभले आहे.

यंदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर पश्चिमी प्रसार माध्यमांमधून प्रचंड आरोप झाले. विशेषतः त्यांचा प्रतिस्पर्धी नावलेन याचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर त्याबाबत पुतीन यांच्यावर दोषारोप केले गेले. इतकेच नव्हे तर या निवडणुका म्हणजे फार्स आहेत, एका हुकूमशहाने जगाची फसवणूक करण्यासाठी केलेले हे एक नाट्य आहे, अशा स्वरूपाच्या अनेक प्रकारच्या टीकाटिप्पण्या पश्चिमी जगताने केल्या. परंतु या सर्वांपलीकडे जाऊन त्यांची राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेली निवड ही जागतिक राजकारणावर परिणाम करणारी आहे हे निश्चित.

विशेषतः युक्रेन युद्धाचा विचार करता आता हे युद्ध 'इगो वॉर' झाले आहेत. एकीकडे पुतीन यामध्ये माघार घेण्यास तयार नाहीत, तशाच प्रकारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हेदेखील मागे हटण्यास तयार नाहीयेत. त्यामुळे हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता दिसत नाहीये. दुसरीकडे अमेरिकेमध्येही राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंग घेत आहे. सध्याच्या परिस्थितीवरून डोनाल्ड ट्रम्प हे जोरदार मुसंडी मारून पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अमेरिका अंतर्गत राजकारणात अडकलेली असताना दुसरीकडे युके्रनला आर्थिक मदत करण्यासंबंधीचे प्रचंड मोठे ठराव अमेरिकन काँग्रेसमध्ये अडकून पडलेले आहेत.

पश्चिमी युरोपियन देश युक्रेनला भरपूर आर्थिक मदत करताहेत. पण त्यांनाही आता मर्यादा येत आहेत. त्यातूनच अलीकडे जर्मनीने भारताला युद्धसाहित्य देण्याबाबत विचारणा केली होती. अशा परिस्थितीत पुतीन यांनी घवघवीत विजय मिळवल्याने येत्या काळात त्यांची युक्रेनविरोधातील आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे. ताज्या विजयाने पुतीन यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असल्यामुळे अमेरिकेसह पश्चिम युरोपियन देशांचे धाबे दणाणले आहेत. याचे कारण अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटोचे लष्कर आणि रशियन सैनिक यांच्यात संघर्ष झालाच तर अवघे जग तिसर्‍या महायुद्धापासून केवळ एक पाऊल अंतरावर असेल, असा गर्भित इशारा पुतीन यांनी दिला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये पुतीन यांनी अणुहल्ल्याच्या धमक्या अनेकदा दिल्या आहेत. पण आता त्याकडे पाहण्याचा जगाचा द़ृष्टिकोन बदलणार आहे. युक्रेन युद्ध यापुढेही सुरू राहणार असेल तर युरोपची विस्कटलेली आर्थिक घडीही अशीच पुढे कायम राहणार हे निश्चित आहे. युरोपचा आर्थिक विकासाचा दर मंदावणे, बेरोजगारी, गरिबी वाढणे आणि महागाईचा स्फोट होणे ही संकटे लवकर संपण्याच्या शक्यता या विजयाने मावळल्या आहेत, असे म्हणावे लागेल. आजवर कुणी कल्पनाही न केलेला 'कॉनफ्लिक्ट झोन' या युद्धामुळे युरोपमध्ये निर्माण झाला आणि त्यातून आता नवशीतयुद्ध आकाराला येते आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. आता पुतीन यांच्या विजयोत्तर विधानांमुळे या चर्चेला पुष्टी मिळत आहे. विशेषतः चीनबाबत त्यांनी केलेली विधाने भारतासाठीही चिंतेची ठरणारी आहेत. चीन हा आमचा नैसर्गिक भागीदार आहे आणि कठीण प्रसंगात चीन आमच्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळे येत्या काळात रशिया-चीन यांच्यातील संबंध घनिष्ट बनवण्यावर आमचा भर असेल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. यातून पुन्हा एकदा रशिया-चीन-इराण-सीरिया यांच्यात एक युती तयार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत ट्रम्प यांचे पुनरागमन झाल्यास पुतीन आणि ट्रम्प हे जगाला नव्या शीतयुद्धाकडे नेण्याची दाट शक्यता आहे.

पुतीन यांच्या काळात भारत आणि रशिया यांच्यातील संबंध घनिष्ठ बनत गेले. दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदा स्ट्रॅॅटेजिक पार्टनरशिप आकाराला आली. तसेच दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील द्विपक्षीय संवादाची परंपराही पुतीन यांच्या कार्यकाळात सुरू झाली. याची मुहूर्तमेढ अटलजींच्या काळात रोवली गेली. रशिया हा जगातील एकमेव असा देश आहे की, ज्याचे प्रमुख भारताच्या प्रमुखांना दरवर्षी न चुकता भेटतात. कोरोना काळात या दोघांमध्ये ऑनलाईन बैठक पार पडली होती. आज भारत संरक्षण क्षेत्रातील 60 टक्के हार्डवेअर रशियाकडून घेत आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमती कडाडल्यानंतर भारताने अत्यंत धाडसी निर्णय घेत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल आयात सुरू केली आणि पाहता पाहता रशिया भारताला सर्वाधिक तेल पुरवठा करणार्‍या देशांच्या यादीत 12 व्या स्थानावरून दुसर्‍या स्थानावर पोहोचला.

भारताने आतापर्यंत 10 अब्जहून अधिक किमतीचे तेल रशियाकडून घेतले आहे. विशेष म्हणजे रशियाकडून आयात केलेले हे कच्चे तेल शुद्धीकरण करून भारतातील तेल कंपन्या अमेरिका आणि युरोपमधील देशांना विकत आहेत. जर्मनीसारख्या काही युरोपियन देशांचा क्रमांक एकचा तेल पुरवठादार भारत बनला आहे. विशेष म्हणजे भारताने अमेरिकेच्या दबावाला झुगारून रशियाकडून तेल आयात केली आहे. रशिया हा भारताचा 'ट्रस्टेड पार्टनर' आहे. भारताला संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील तंत्रज्ञान हस्तांतरण करणारा रशिया हा एकमेव देश आहे. अमेरिका अलीकडील काळात याबाबत तयारी दर्शवत असला तरी पूर्णपणे तयार नाहीये. याउलट ब्राह्मोस हा भारत-रशिया यांच्यातील संयुक्त प्रकल्प आहे. अणुऊर्जेच्या क्षेत्रात रशिया भारताला मोठ्या प्रमाणावर मदत करत आला आहे. तथापि, रशियाने चीनशी अधिक घनिष्ट मैत्री केल्यास त्याचे भारतासोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT