Latest

Putin Declares Martial Law : रशियाकडून युक्रेनच्या 4 भागात ‘मार्शल लॉ’ लागू! पुतिन यांची घोषणा

रणजित गायकवाड

मॉस्को, पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. पुतीन यांनी युक्रेनकडून हिसकावलेल्या चार प्रदेशात मार्शल लॉ लागू केल्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. रशियाने कब्जा केलेल्या डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझ्झ्या आणि खेरसन भागात युक्रेनियन सैन्याने मुसंडी मारली आहे. रशियात बळजबरीने सामील करण्यात आलेल्या या चार प्रदेशांपैकी बहुतांश प्रदेश युक्रेनने पुन्हा ताब्यात घेतल्याचे समजते आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या चार प्रदेशात मार्शल लॉ लागू केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पूर्व युक्रेनमधील प्रदेशांसाठी लागू केलेल्या या निर्णयाकडे रशियासाठी एक निर्णायक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसनमधून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. युक्रेनियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असल्याचा दावा रशिय अधिकाऱ्यांनी केला आहे. तथापि, स्थानिक रहिवाशांना बाहेर काढल्यानंतर पुतिन कमी क्षमतेचे अणुबॉम्ब वापरू शकतात अशी भीती युरोपीय देशांना वाटत आहे.

आदेश संसदेकडे (ड्यूमा) पाठवला…

पुतिन म्हणाले की, मी रशियन फेडरेशनच्या या चार प्रदेशांमध्ये (डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझ्झ्या आणि खेरसन) मार्शल लॉ लागू करण्याच्या प्रत्येक वटहुकुमावर स्वाक्षरी केली आहे. हे आदेश ताबडतोब फेडरेशन कौन्सिलकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. तसेच संसदेला (ड्यूमा) या निर्णयाची माहिती दिली जाईल. सुरक्षा परिषदेच्या सदस्यांशी टेलिव्हिजनवरील संभाषणादरम्यान, पुतिन यांनी युक्रेनच्या कब्जात असणा-या प्रदेशांना मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्यासाठी पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांच्या नेतृत्वाखाली विशेष समन्वय परिषद स्थापन करण्याचे निर्देश दिले. ही समिती डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझ्झ्या आणि खेरसन येथे रशियाने दिलेल्या मदतीवर देखरेख करेल.

रशिया खेरसनमधून लोकांना बाहेर काढत आहे

युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे नेतृत्व करत असलेल्या नव्या कमांडरने खेरसनमधून युक्रेनियन नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. या नागरिकांना रशियानेच ताब्यात घेतलेल्या दुसर्‍या प्रदेशात पुनर्वसन केले जाईल. रशियन हवाई दलाचे माजी कमांडर सर्गेई सुरोविकिन यांनी कबूल केले की खेरसनमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे आणि त्याच्या आसपासच्या भागात अजूनही युद्ध सुरू आहे. सुरक्षेची परिस्थिती पाहता या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असल्याचा दावा रशियाने केला आहे. या लोकांना रशियाकडून मोठी आर्थिक मदत देखील दिली जात आहे, ज्यात नोकरी, अन्न आणि पाणी आणि सुरक्षेच्या हमींचा समावेश आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT