Latest

IPL 2023 : पंजाब किंग्जविरुद्ध विजयीपथावर पोहोचण्यासाठी गुजरात प्रयत्नशील

Arun Patil

मोहाली, वृत्तसंस्था : मागील लढतीत रिंकू सिंगचा तडाखा सोसावा लागल्यानंतर त्यातून सावरत आता पंजाब किंग्जविरुद्ध लढतीच्या माध्यमातून आयपीएल स्पर्धेत (IPL 2023) विजयपथावर परतण्याचा विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्स संघाचा प्रयत्न असणार आहे.

वास्तविक, गुजरात टायटन्स संघातर्फे देखील युवा साई सुदर्शन, विजय शंकर व अफगाणचा हॅट्ट्रिकवीर राशिद खान यांनी दर्जेदार योगदान दिले होते. हार्दिक पंड्याची तब्येत ठीक नसल्याने त्याच्या गैरहजेरीत राशिदनेच नेतृत्वाची धुरा हाताळली होती. पण, रिंकूने शेवटच्या षटकात जोरदार हल्ल्याने गुजरातला पुरते सैरभैर करून टाकले होते.

शेवटच्या 5 चेंडूत 29 धावांची आवश्यकता असताना रिंकूने सलग 5 षटकार खेचणे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. शेवटच्या षटकातील हा धक्का गुजरातला प्रदीर्घ काळ विसरता येणार नाही, असा आहे. मात्र, तूर्तास पुढील लढतीत लक्ष केंद्रित करण्यासाठी गुजरातला या धक्क्यातून वेळीच सावरणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

गुजरातचा संघ बुधवारच्या लढतीपूर्वी 3 सामन्यांत 4 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान होता. आताही काही सामने लागोपाठ जिंकत गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये येण्याची त्यांना संधी असेल. पण, यासाठी त्यांना सर्वप्रथम पंजाब किंग्जविरुद्ध सर्व ताकद एकवटून खेळावे लागेल. पंजाबने अलीकडील कालावधीत उत्तम सातत्य राखले असून हेच त्यांचे बलस्थान ठरत आले आहे.

पंजाबला यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यांच्यासाठी हा वेक अप कॉल मानला जातो. कर्णधार शिखर धवन व युवा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग उत्तम बहरात असल्याने या संघाला दोन्ही आघाड्यांवर फारशी चिंता नाही.

गुजरात टायटन्सला आजच्या लढतीत धवनला सूर सापडण्याआधीच बाद करण्यावर भर द्यावा लागेल. अन्यथा, एकदा सेट झाल्यानंतर धवनला बाद करणे किती दुरापास्त होऊ शकते, याची हार्दिक पंड्याला देखील कल्पना असणार आहे.

पंजाबकडे दोन्ही आघाड्यांवर दिग्गज खेळाडू (IPL 2023)

दुसरीकडे, पंजाबकडे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू सॅम कुरेनसह लियाम लिव्हिंगस्टोन व जितेश शर्मा हे ताफ्यात उपलब्ध असून गोलंदाजीत अर्शदीप व नॅथन इलिससारखे महत्त्वाचे खेळाडू लक्षवेधी योगदान देण्याची क्षमता राखून आहेत. गुजरात टायटन्सकडे शुभमन गिल, सुदर्शन, लेट ब्लूमर, विजय शंकर अशी फायर पॉवर आहे. मागील सामन्यात रिंकूने 5 षटकारांची आतषबाजी केली नसती तर विजय शंकरच्या खेळीचे विशेष कौतुक झाले असते. पण, यश दयालच्या त्या शेवटच्या षटकात सारे चित्र बदलून गेले आणि अर्थातच विजय शंकरची खेळी झाकोळली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT