Latest

Punjab AAP minister Fauja Singh Sarari | पंजाबमधील ‘आप’ सरकारला धक्का, आणखी एका मंत्र्याचा राजीनामा, १० महिन्यांत दोन मंत्री पायउतार

दीपक दि. भांदिगरे

चंदीगड : पुढारी ऑनलाईन; पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री फौजा सिंग सरारी (Punjab AAP minister Fauja Singh Sarari) यांनी शनिवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. फौजा सिंग सरारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यात ते पैसे उकळण्यासाठी एक डील निश्चित करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. विरोधकांनी घेरल्याने अखेर सरारी मंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत.

दरम्यान, सरारी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे पाठवला आहे आणि त्यांनी तो स्वीकारल्याचे समजते. अशाप्रकारे १० महिन्यांच्या आत आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारमधून राजीनामा देणारे ते दुसरे मंत्री ठरले आहेत. याआधी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत: माजी आरोग्य मंत्री डॉ. विजय सिंगला यांना मंत्रिमंडळातून हटवले होते. आरोग्यमंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतले असून त्यांच्याकडे पुरावे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

दरम्यान, सत्ताधारी आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवक्ते मलविंदर सिंग यांनी सांगितले की, सरारी यांनी वैयक्तिक कारणांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. फौजा सिंग फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया खात्याचे मंत्री होते. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फौजा सिंग म्हणाले की, मी पक्षाचा एक निष्ठावान सैनिक आहे आणि कायम राहील.

त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर फौजा सिंग सरारी यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. या ऑडिओमध्ये सरारी कंत्राटदारांकडून वसुलीसाठी काही लोकांना कथितरित्या अडकवण्याबाबत चर्चा करत आहेत. काँग्रेस सदस्यांनीही मुख्यमंत्री भगवंत मान यांना जाब विचारला आणि आप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. तर फौजा सिंग सरारी हे त्यांच्या स्वीय सचिवाशी कोणाकडून पैसे कसे घ्यायचे याबाबत बोलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. (Punjab AAP minister Fauja Singh Sarari)

मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

कॅबिनेट मंत्री फौजा सिंग सरारी यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील अनेक मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आप सरकारच्या मंत्रिमंडळात आता अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. आज संध्याकाळीच नवीन मंत्र्यांचाही शपथविधी होण्याची शक्यता आहे. हरजोत बैंस आणि अनमोल गगन मान यांची खातीही बदलली जाण्याची चर्चा आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT