पुणे : पुणे शहरात मार्केटयार्ड येथे सर्व संघटनांनी जाहीर पाठिंबा देत मार्केटयार्ड परिसर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचे पडसाद राज्यभरात पडताना दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुणे शहरासह जिल्ह्यात विविध संस्था, संघटनांतर्फे साखळी उपोषण, कँडल मार्च तसेच आंदोलने करण्यात येणार आहेत.
अखिल श्री छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ, चव्हाणनगर, तळजाई पठार, गणेशनगर, धनकवडी, बालाजीनगर येथील नागरिक अहिल्यादेवी चौक, धनकवडी येथे साखळी उपोषण करणार आहेत. आंबेगाव बु. येथील चिंतामणी गृहनिर्माण सोसायटीतर्फेही सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत अन्नत्याग करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून मांजरी व हडपसर परिसरात अण्णासाहेब मगर महाविद्यालय, गोपाळपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मांजरीपर्यंत कँडल मार्च काढण्यात येणार आहे. सकल मराठा समाज नवी पेठ-सदाशिव पेठच्या वतीने लकडी विठ्ठल मंदिराबाहेर, अलका चौक येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, तर मराठा समाज कोथरूड यांच्या वतीने आशिष गार्डन, संगम चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत सायंकाळी 4 वाजता मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.