पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, यंदा मोसमी पाऊस उशिराने येणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मोसमी पाऊस उशिराने सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने धरणांमधील पाण्याचा आढावा घेतला. त्यात ही बाब समोर आली आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.
तसेच शहराच्या पूर्वभागाला भामा आसखेड प्रकल्पातून काही प्रमाणात पाणी घेण्यात येते. यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण 9.91 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर धरणात 0.24 टीएमसी (6.46 टक्के), वरसगाव धरणात 5.89 टीएमसी (45.95 टक्के), पानशेत धरणात 2.66 टीएमसी (24.96 टक्के) आणि खडकवासला धरणात 1.12 टीएमसी (56.82 टक्के) पाणीसाठा 8 मे रोजी आहे.
दरम्यान, 8 मे रोजी सन 2017 मध्ये चारही धरणांत मिळून केवळ 6.88 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. 2018 मध्ये 8.11 टीएमसी, सन 2019 मध्ये 5.17 टीएमसी, सन 2020 मध्ये 10.25 टीएमसी, सन 2021 मध्ये 11.22 टीएमसी, तर गेल्या वर्षी 8 मे रोजी चारही धरणांत मिळून 9.34 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यंदा गेल्या सात वर्षांचा विचार करता समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच ग्रामीण भागासाठी खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्याच्या माध्यमातून दररोज 1054 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी (7 मे) रात्री देखील जिल्ह्यातील आठ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये विसापूर धरणात एक मिलिमीटर, आंद्रा धरणात चार मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांत प्रत्येकी दोन मि.मी., तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मि.मी., निरा देवघर धरणात 24 मि.मी., भाटघर धरणात 35 मि.मी. आणि वीर धरणात 27 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.