पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील विविध भागात वाहनचोरी करणार्या चौघा सराईतांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख रुपये किंमतीच्या 11 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चारही आरोपी रेकॉर्डवरील आहेत. पुण्याच्या बाहेर वाहने विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली आहे.
सुरज श्रीकांत कांबळे, गणेश बबन लोंढे (दोघे. रा. महंमदवाडी रोड), अनिकेत उर्फ मॉन्टी शरद माने (महंमदवाडी), भिमाशंकर उर्फ भिमा हरिभाऊ लाळगे (रा. महंमदवाडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वानवडी पोलीस ठाण्यातील चार, हडपसरमधील दोन, कोंढवा पोलीस ठाण्यातील दोन आणि लातुर जिल्ह्यातील मुरूड पोलीस ठाण्यातील एक असे 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.
वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत होते. यादरम्यान काही संशयित तरूण चोरीची दुचाकी वाहने जिल्ह्याबाहेर विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती कर्मचारी सर्फराज देशमुख, निलकंठ राठोड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्त केली. आरोपीपैकी मॉन्टी माने हा मोक्का गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेला आहे. तर, लाळगे हा कोंढवा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयंत जाधव,उपनिरीक्षक अजय भोसले कर्मचारी विनोद भंडलकर, अमजद पठाण, संतोष नाईक, अतुल गायकवाड यांच्या पथकाने केली.