Latest

पुणे-नगर महामार्गावर वाहतूक नियमांची ‘ऐशीतैशी’; अवजड वाहनांची जीवघेणी स्पर्धा

अमृता चौगुले

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : दगड, खडी, क्रशसँडची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांची नगर महामार्गावर सध्या
जीवघेणी स्पर्धा वाढली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर महसूल, प्रादेशिक परिवहन, वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. नगर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त माल भरून जडवाहने बिनधास्त धावताना दिसून येत आहेत. परिवहन विभागासह वाहतूक व महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याने जडवाहनांची ही जीवघेणी स्पर्धा वाढली आहे.

'टोकन घ्या आणि बिनधास्त नियमांचे उल्लंघन' करा अशा प्रकारचा अलिखित परवानाच संबंधित विभागांकडून देण्यात आल्याने वाहनचालक सर्रास नियमांची पायमल्ली करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. यातील बहुतांश वाहने ही नेते व कार्यकर्त्यांची असल्याने परिवहन, महसूल व वाहतूक विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, कर्कश हॉर्न वाजवणे, भरधाव व विरुद्ध दिशेने धोकादायकपणे वाहने चालवणे या जीवघेण्या स्पर्धेमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगर मार्गावरील अपघातांत अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालक, मालकांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महसूल, परिवहन व पोलिस विभागाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सिमेंट, वाळू, खडी, क्रशसँड वाहतूक करणार्‍या वाहनांवर आच्छादन बंधनकारक असताना नियमांची पायमल्ली होताना दिसून येते. हवेत उडणारे क्रशसँडचे बारीक कण नागरिकांच्या विशेषतः दुचाकी वाहनधारकांच्या डोळ्यांत जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. धुळीमुळे यापूर्वीसुद्धा अनेक अपघात झाले आहेत.

                                        – संदीप सातव, नागरिक

वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्‍या अवजड वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यापुढे कारवाई सातत्याने केली जाईल.

                                            -संजीव भोर,
                                   उप परिवहन, अधिकारी

अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाशी (आरटीओ) पत्रव्यवहार केला आहे. या वाहनांच्या वाहतुकीसाठी ठरावीक वेळ ठरलेली नाही.

                                              – जयंत पाटील,
                  सहायक पोलिस निरीक्षक, लोणीकंद वाहतूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT