पुणे, पुढारी वृत्तसेवा: कॅशबॅकची ऑफर एक तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. पैसे तर मिळालेच नाहीत, मात्र त्याच्या बँक खात्यातून 1 लाख 88 हजार रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी शिवणे येथील 33 वर्षीय तरुणाने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगचे काम करतो. त्याच्या मोबाईलवरती सायबर चोरट्यांनी कॅश बॅकची ऑफर असल्याचा मेसेज पाठवून एक लिंक पाठली. फिर्यादीला वाटले खरेच बँकेकडून मेसेज आला आहे. त्यामुळे त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले. त्याचवेळी सायबर चोरट्याने त्या लिंकच्या माध्यमातून फिर्यादीच्या बँक खात्याचा ताबा आपल्याकडे घेऊन पैसे काढून घेतले. पैसे कमी झाल्याचा मेसेज येताच त्यांनी सायबर पोलिसात याबात तक्रार दिली होती. त्यानुसार उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.