Latest

पुणे : अखेर गज्या मारणेसह १४ जणांवर मोक्का कारवाई

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १४ जणांच्या टोळीवर मंगळवारी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्काची कारवाई करण्यात आली. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण केले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलुस), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा.नर्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यात चौघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गज्या मारणे व इतर आरोपी फरार झाले आहेत.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा याकरीता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तसा प्रस्ताव पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना पाठविण्यात आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गज्या मारणे मार्च महिन्यात स्थानबद्धतेच्या कारवाईतून सुटून बाहेर आला होता. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरु असल्याचे नुकत्याच दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यानंतर समोर आल्यानंतर आता गज्या मारणेला मोक्काचा दणका देण्यात आला आहे.

मिरवणुकीनंतर पोलीस आयुक्तांचा कारवाईचा धडाका

तळोजा कारागृहातून सुटल्यावर गजा मारणेच्या मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी टोळ्यांना गुन्हेगारी कृत्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काचा धडाका सुरू करण्यात आला होता. मंगळवारी 102 वी मोक्काची कारवाई करत गज्या मारणेच्या टोळीवर आता मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी एमपीडिए अंतर्गतही 78 जणांना कारागृहाची हवा खाण्यासाठी पाठवले आहे. तर बऱ्याच गुंडांवर ताडीपारची कारवाई करून पुण्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT