पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारने शेतकर्यांना प्रति क्विंटल 350 रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी पुणे जिल्ह्यात संबंधित बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची विक्री केलेल्या शेतकर्यांनी 20 एप्रिलपुर्वी अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्राकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांना मंजूर अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
शेतकर्यांना कांदा अनुदान अर्जाचा नमुना कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व नाफेड खरेदी केंद्रावर सर्व शेतकर्यांना निःशुल्क उपलब्ध आहे. तसेच शेतकर्यांस साध्या कागदावर देखील दयावयाची माहिती ही संबंधित कागदपत्रे जोडून देता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकर्यांनी संबंधित विक्री केलेल्या ठिकाणी अथवा बाजार समित्यांकडे अर्ज सादर करताना अर्जासोबत कांदा विक्री पट्टीची मूळ प्रत, कांदा पिक पेरा नोंद असलेला सात बारा उतारा तसेच राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा सहकारी बँक, खाजगी बँक इत्यादींच्या ज्या बँकेत शेतकर्यांनी खाते उघडलेले आहे, त्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (आयएफएससी कोड व अकाऊंट नंबर सह) जोडावयाची आहे.