अशोक मोराळे
पुणे : चालू वर्षातील पाच महिन्यांत (15 मे अखेर) शहरात 35 खुनाच्या, तर 70 जणांवर खुनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. एकंदर या गुन्ह्यामागील कारणे पाहिली, तर सर्वाधिक किरकोळ कारण अनेकांच्या जीवावर उठत असल्याचे दिसून येते.
बर्याच घटनांमध्ये वाद हा किरकोळ असतो, मात्र क्षणभराच्या रागात हल्ला करणारी व्यक्ती आपण काय करतो आहोत, याचा विचार न करता गुन्हा करते. अशाच किरकोळ व तत्कालीन कारणातून शहरात 17 खुनाच्या घटना घडल्या आहेत, तर तब्बल 37 जणांवर अशाच कारणातून खुनी हल्ले झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे क्षणिक रागाला आवर घालणे किती महत्त्वाचे आहे, हे यावरून समजते.
पूर्ववैमनस्य, प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, किरकोळ कारण, घरगुती, चारित्र्याचा संशय व अज्ञात अशा विविध कारणांतून खून व खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या आहेत. किरकोळ कारणानंतर घरगुती व अनैतिक संबंधांच्या कारणाचा आकडा मोठा आहे. तर, पूर्ववैमनस्यातून खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांचा दुसरा क्रमांक लागतो.
कारणे खून खुनाचा प्रयत्न
पूर्व वैमनस्यः 01 21
प्रेमसंबंध ः 01 00
अनैतिक संबंधः 03 00
किरकोळ कारणः 17 37
घरगुतीः 05 05
चारित्र संशयः 00 03
अज्ञात ः 08 04
परिमंडळ पाच खुनाचा, तर तीन खुनाच्या प्रयत्नचा हॉटस्पॉट असल्याचे दिसून येते. चालू वर्षातील 16 मेअखेर परिमंडळ पाचच्या हद्दीत 15 खून झाले असून, दुसरा क्रमांक परिमंडळ चारचा लागतो. तर, सर्वाधिक खुनाच्या प्रयत्नाच्या घटना परिमंडळ तीनच्या हद्दीत झाल्या असून, त्याचा आकडा 19 च्या घरात आहे.