Latest

तडका : आम्ही कशाचे सरपंच?

Arun Patil

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊन गेल्या आहेत. अशाच एका छोट्याशा खेड्यातील हा संवाद.
राम राम सरपंच, राम राम!
कशाचे सरपंच? आमची बायको सरपंच.
तेच हो ते. तुम्ही काय आनं वैनी काय? आम्हाला दोघेही सारखेच.
काय सारखं नाही. पार इस्कोट झालाय संसाराचा.
कसं काय रे भाऊ? समदं तर बेस्ट चाललेलं दिसत आहे.
नाही रे बाबा! ज्याचं दुःख त्याला माहिती असते. परवा खालच्या आळीतल्या सुंदराबाईंनी अविश्वासाची धमकी दिली आहे. तिचं बाळतपण जवळ आहे. त्याचा सगळा खर्च आम्ही करावा म्हनती ती. कर्म कुणाचे आणि सजा कुणाला?
अरे करा की मग तिचं बाळतपण! मिरवायला पाहिजे तर कष्ट नको का करायला?

ग्रामपंचायतीत बारा बाया निवडून आल्यात. आज त्यांचे बाळंतपण करा, उद्या चालून त्यांच्या पोरींचे, सुनांचे बाळंतपण करा. काय शेती सोडून देऊन डिंकाच्या लाडूची फॅक्टरी टाकू का काय?
म्हंजे, याच्यापेक्षा बाप्ये परवडले आसते म्हणा की?
अरे, बाप्यांचं काय सांगू नकोस. तिसरं अपत्य होऊ नये म्हणून 24 तास परेशान असतात. बायको पोटूशी राहिली तिसर्‍या टायमाला म्हणून गणपतरावांनी तिला घटस्फोटाची नोटीस दिली, वकील लावला आन या सगळ्याचा खर्च कुणी करायचा तर आम्ही. कारण हा अपात्र ठरला की, ग्रामपंचायत गेली हातातून.
म्हंजे तुम्ही शेतीत पैसा कमवायचा आणि खर्चायचा वैनी साहेबांच्या राजकारणात, आसं चाललय म्हना की?

शेताकडे बघायला टाईम कुनाला हाये? मोठं पोरगं पहिले शेती बघायचं, ते आता आईबरोबर असते, बॉडीगार्ड म्हणून. त्याच्या आईसंग असलं का नुसतं इकडे तिकडे टकामका बघत राहते. जसं काही मोठे मोठे नेते सोडून दहशतवादी याच्या आईला गोळ्या घालणार आहेत.
अवघड झालं की मग! बरं, लहान काय करते सध्या.
लहान कशाचं? पार मिसरूड फुटली आहे त्याला. ते गावातले कार्यकर्ते सांभाळायचं काम करते. दिवस उगवता जाते ते रात्री उशिराच घरी परत येते. असले कसले कार्यकर्ते म्हणतो मी. माझं तर डोस्क फिरायला आलया.
काही इलाज काढला असेल ना मग याच्यावर?

काढलाय पण कुणाला सांगू नको. पुढच्या इलेक्शनला तुझ्या वैनीचे डिपॉझिट बी गायब व्हायला पाहिजे असा डाव करतो. असा राजकारणाचा डाव खेळतो की, वार्डातून बी निवडून यायला नको. एकदा का पडली ना इलेक्शनला, का नीट घरी राहील आन चुलीवर भाकर्‍या बडवायला लागंल.
बरी आयडिया काढली. येतो मी, राम राम!

देवा, काय ही वेळ माझ्यावर आणलीस, गावकर्‍यांची कामं करता कधी बायकोच्या सरपंचपदाची कार्यकाळ निघून जाईल, हे कळणारसुद्धा नाही. घर आणि शेतापेक्षा सर्व वेळ आता ग्रामपंचायत कार्यालयात आणि लोकांना वेळ देण्यातच जातोय! तिकडे शेतातील कामं तशीच पडून आहेत. पिकासनी पाणी पाजायची आहेत, जनावरांच्या वैरणीची सोय करायची आहे. आमच्या 'सौं'चा संमधा वेळ लोकांची गार्‍हाणी ऐकण्यातच जात आहे. घरी आल्यानंतरही महिला काही आमच्या 'सौं'ची पाठ सोडत नाहीत; पण एक बरं हाय, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं समाधान हाय बघा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT