कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी केलेल्या चौफेर कार्याच्या इतिहासात अबालवृद्ध गुरुवारी रमले. निमित्त होते दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन व ब्रिलियंट स्कूल नरंदे यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय शालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे.
इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा झाली. प्रत्येक शाळेतून गटनिहाय दोन विद्यार्थ्यांचा एक संघ सहभागी होता. राजर्षी शाहू महाराज व विज्ञान, गणित, भूगोल, चालू घडामोडी हे स्पर्धेचे फेरीनिहाय विषय होते.
पारितोषिक वितरण दै. 'पुढारी'चे सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, कोल्हापूर पुराभिलेख विभागाचे पुरालेखाधिकारी गणेशकुमार खोडके, इंग्लिश मीडियम स्कूल असो.चे जिल्हाध्यक्ष गणेश नायकुडे, कार्याध्यक्ष के. डी. पाटील, शहराध्यक्ष अमर सरनाईक, मेन राजाराम हायस्कूलचे प्राचार्य सागर नाईक यांच्या हस्ते झाले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, राजर्षी शाहूंची प्रतिमा व सर्व सहभागींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून व संयोजन जिनियस पब्लिक स्कूलचे माणिक पाटील, ऋषीकेश दैणे, सिद्धार्थ कुराडे व सहकार्यांनी काम पाहिले. विक्रम रेपे यांनी प्रास्ताविक केले. शुभदा कामत यांनी सूत्रसंचालन केले. माणिक पाटील यांनी आभार मानले.
स्पर्धेत सहभागी शाळा …
मनपा नेहरूनगर विद्यालय, राजवीर पब्लिक स्कूल-वाशी, मेन राजाराम हायस्कूल, कळंबा गर्ल्स हायस्कूल, गुरुकुल विद्यालय-अब्दुललाट, जिनियस पब्लिक स्कूल-भुयेवाडी, कर्मवीर स्कूल-फुलेवाडी, वक्रतुंड स्कूल-राधानगरी, आनंद गुरुकुल- सरवडे, प्रिन्स शिवाजी स्कूल-शिवाजी पेठ, विबग्योर स्कूल, पद्माराजे हायस्कूल, मनपा टेंबलाईवाडी, शीलादेवी विद्यालय-तपोवन,विद्यामंदीर-कणेरीवाडी,एस.एम. लोहिया हायस्कूल.
विद्यार्थी-शिक्षकांचे सादरीकरण
'बहुजनांचा कैवारी तू, रयतेचा तू राजा… तु्झ्या स्मृतीला करतो वंदन, छत्रपती तू शाहू राजा…' असे कवण शशिकांत मुद्दापुरे (अब्दुललाट) यांनी सादर केले. संजीवन स्कूल, रंकाळा येथील विद्यार्थिनी स्वराली जाधव व गायत्री देशपांडे यांच्यासह इंंदुमती हायस्कूलच्या शिक्षिका स्वप्नाली यादव, आदर्श स्कूल-वाकरेचे अक्षय निकम यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून या अनोख्या उपक्रमाबद्दल दै. 'पुढारी'चे अभिनंदन केले.
स्पर्धेचा निकाल
मराठी माध्यम : पाचवी ते सातवी : प्रथम-उषाराजे गर्ल्स हायस्कूल, द्वितीय-आदर्श स्कूल, वाकरे. आठवी ते दहावी – आदर्श स्कूल-वाकरे, इंदुमती हायस्कूल. इंग्रजी माध्यम : पाचवी ते सातवी : अंबुबाई पाटील स्कूल-गोकुळ शिरगाव, राजेंद्र विद्यामंदिर-हालोंडी. आठवी ते दहावी : विजयादेवी यादव स्कूल-पेठवडगाव, संजीवन स्कूल-शिवाजी पेठ.
मेन राजाराम हायस्कूलमध्ये झाली अनोखी स्पर्धा
वारसा सप्ताहानिमित्त राजर्षी शाहूंच्या कार्याची साक्ष देणार्या कोल्हापूरातील जुना राजवाडा परिसरातील मेन राजाराम हायस्कूलच्या ऐतिहासिक वास्तूत गुरुवारी ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. याला संपूर्ण जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.