Latest

चवीने खाणार तो ‘महामिसळ महोत्सवा’ला नक्की भेट देणार

अमृता चौगुले

पुणे : दै. 'पुढारी'ने मागील वर्षी आयोजित केलेल्या 'महामिसळ महोत्सवा'ला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता यंदा देखील हा महोत्सव पुन्हा एकदा आयोजित केला जात आहे. वेगवेगळ्या चवींच्या मिसळी चाखण्याची संधी येत्या दि. 25 व 26 फेब्रुवारी या खास वीक एंडच्या दिवसांत खवय्यांना मिळणार आहे. 'महामिसळ महोत्सव – सीझन 2' हा दिमाखदार सोहळा म्हात्रे पुलाजवळील 'सृष्टी लॉन्स'मध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत रंगणार आहे.

कडधान्यांच्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे, शिजवलेले पोहे, कांदा व कोथिंबीर घालून बनलेले हे झणझणीत मिश्रण सगळीकडे सुप्रसिद्ध आहे. हा खरे तर आता महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ बनला आहे. गेली अनेक दशके या मिसळीने खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, खवय्यांची भूक छोटी असो वा मोठी, अनेकदा ही मिसळच मदतीला धावून येते. मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे भुकेच्या वेळी अस्सल खवय्यांना मिसळ आठवतेच, त्याशिवाय मित्रमंडळींना एकत्र जमण्यासाठीही मिसळ हेच निमित्त असते.

मिसळीची चव आणि ती बनवण्याची पद्धत प्रांतवार बदलत जाते. अनेक जण त्यात विविध प्रकारचे पाककृती प्रयोग करून त्याची लज्जत वाढवतात. परिणामी, त्याचे रूपडे अधिकच खुलते आणि खवय्यांची रसनाही तृप्त करते. पुण्याची चवदार मिसळ, मुंबईची ठसकेबाज मिसळ, कोल्हापूरची झणझणीत तर्री असलेली मिसळ, अहमदनगर येथील गावरान मिसळीचा ठसका या सगळ्या मिसळीच्या प्रकारांनी आपले वेगळेपण खवय्यांच्या मनात कायमच जपले आहे. नाशिक मिसळ, दही मिसळ, नादखुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ असे प्रकार यात लोकप्रिय होऊ लागले आहेत.

'पुढारी'तर्फे आयोजित 'महामिसळ सीझन 2' या महोत्सवात आता या अनेक प्रकारांचा आस्वाद घेत पुणेकरांना सहकुटुंब मनसोक्त पोटोबा करता येणार आहे. एकाच छताखाली अनेक चवी, अनेक मसाले यांचा आस्वाद घेत गप्पागोष्टी करता येणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सुमारे 12 हजार खवय्यांनी या महोत्सवाचा लाभ घेतला. दरवर्षी हा असा महोत्सव आयोजित करावा, या त्यांच्याच आग्रहास्तव यंदा तो पुन्हा घेण्यात येत आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगरमधील विविध ठिकाणच्या प्रसिद्ध 18 मिसळ स्टॉल्सचा समावेश या 'महामिसळ महोत्सवा'त असणार आहे. त्यामुळेच चवीने खाणार, तो 'पुढारी'च्या 'महामिसळ महोत्सवा'ला नक्की भेट देणार, यात शंकाच नाही.

दै. 'पुढारी' आयोजित..
'महामिसळ महोत्सव – सीझन 2'
स्थळ : 'सृष्टी लॉन्स', म्हात्रे पुलाजवळ
शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 फेब्रुवारी
वेळ : सकाळी 9 ते रात्री 9.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT