Latest

लवंगी मिरची : नवे इंजिनिअरिंग

backup backup

स्थळ ः इंजिनिअरिंग कॉलेज

सर वर्गात येताच सर्व विद्यार्थी 'प्रणाम गुरुदेव' म्हणून अभिवादन करतात.

सर ः (आश्चर्याने) नेहमी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणणारे तुम्ही चक्क 'प्रणाम गुरुदेव' असं म्हणताय! आज काही विशेष आहे का?

विद्यार्थी ः सर, आता इंजिनिअरिंग बरोबर सगळे पौराणिक ग्रंथ आम्हाला शिकायचे आहेत. ते सिलॅबसमध्ये समाविष्ट केले आहेत. त्या पुराणकाळाचा फिल यावा म्हणून आम्ही आजपासून 'प्रणाम गुरुदेव' म्हणायचे ठरवलं आहे.

सर ः (सद्गदित होऊन) मला तर शब्द सूचत नाहीत. मी पण आजपासून 'प्रिय छात्र' म्हणणार.

विद्यार्थी ः चालेल सर आणि आम्हाला आवडेलही!

सर ः तर आता आपण ज्ञानयज्ञाचा प्रारंभ करूयात. आज आपण ब्रीज इंजिनिअरिंग शिकणार आहोत.

विद्यार्थी ः सर, आपले ठरले आहे ना पुराण काळातील भाषा वापरायची म्हणून! आता ब्रीज इंजिनिअरिंग म्हणू नका. सेतू अभियांत्रिकी म्हणा!

सर ः एकदम मान्य! तर आज आपण सेतू अभियांत्रिकीविषयी जाणून घेणार आहोत. सेतू तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा हेतू शुद्ध असतो.

विद्यार्थी ः सर, हेतू शुद्ध नसेल तर सेतू नीट बांधला जात नाही, हे खरेच आहे. आपल्याच महानगरातील उड्डाण सेतूंचे काम आपण पाहतच आहोत.

सर ः त्या उड्डाण सेतूंमागचं कुरुक्षेत्र वेगळंच आहे.

विद्यार्थी ः सर, आपण पुराणातल्या दोन महाकाव्यांची सरमिसळ करीत आहात. सेतू एका महाकाव्यात आहे आणि कुरुक्षेत्र दुसर्‍या महाकाव्यात आहे.

सर ः इथे मी कुरुक्षेत्र हा शब्द राजकारण या अर्थाने वापरला आहे. दोन महाकाव्यांचा संदर्भ दिला म्हणून काहीच बिघडत नाही. नाहीतरी नव्या शैक्षणिक धोरणात इंटर डिसिप्लिनरी आणि मल्टी डिसिप्लिनरी विचार करा असे सांगितलेेच आहे. आपण तर ब्रीज इंजिनिअरिंगच्या निमित्ताने इंजिनिअरिंग सेतू वाले महाकाव्य आणि कुरुक्षेत्र वाले महाकाव्य असे तीन विषय एकत्र आणले. यालाच म्हणतात मल्टी डिसिप्लिनरी अ‍ॅप्रोच.

विद्यार्थी ः सर, कुरुक्षेत्र हा शब्द आपण कोणत्या अर्थाने वापरला?

सर ः वापरला राजकारण या अर्थाने! आता हेच बघा ना, येथे सेतू बांधायचा होता तर आपल्या गायिका आशाताईंनी त्याला विरोध केला होता. त्यावेळी या सेतूवरून राजकारणाचं कुरुक्षेत्र तापलं होतं. आता कुरुक्षेत्रचा अर्थ आला ना तुमच्या लक्षात!

विद्यार्थी ः हो सर! सेतू बांधायचा असेल तर प्रथम काय केलं पाहिजे?

सर ः अरे, आपला इंजिनिअरिंग विषय खूप रुक्ष आहे असं लोक म्हणतात. तो इंटरेस्टिंग करण्यासाठी अशा विषयाला आपण कलेची जोड दिली पाहिजे. सेतू या विषयाशी निगडित गाजलेलं गाणं आठवतंय का कुणाला?

विद्यार्थी ः (ओरडून) 'सेतू बांधा रे सागरी…'

सर ः वा! आता इंजिनिअरिंग, दोन महाकाव्ये आणि गायन कला अशा तीन गोष्टी तुम्ही एकत्र आणल्या.

विद्यार्थी ः सर, सागरी सेतू म्हणजे हे काम पुन्हा गडकरी साहेबांकडे जाणार ना!

सर ः वा! आता तर तुम्ही तीन गोष्टींना नागरिकशास्त्राची जोड दिलीत. तुम्ही उद्याचे जागरूक नागरिक होणार!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT