Latest

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ‘पुढारी’चा सन्मान!

Arun Patil

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील वृत्तपत्र विकेत्यांचे एकमेव शिखर संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सोमवारी (दि. 2) चंद्रपुरातील राजीव गांधी क्रीडा संकुलात थाटात पार पडले. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दै. 'पुढारी'चा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

'पुढारी'च्या वतीने हा सन्मान दै. 'पुढारी'चे सहायक वितरण व्यवस्थापक अमर पाटील यांनी स्वीकारला. राज्यात एकमेव दै. 'पुढारी' हे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून, विक्रेत्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याकरिता विविध उपक्रम राबवीत आहे. या राज्य अधिवेशनात उल्लेखनीय कार्याचे मान्यवर आणि विक्रेत्यांनी तोंडभरून कौतुक केले. वृत्तपत्र विक्रेत्यांना मान, सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापराव जाधव आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी नेहमीच पुढाकार घेतला असल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

अधिवेशनाचे उद्घाटन तेलंगणा न्यूज पेपर सेल्स कन्व्हेनिंग कमिटी निजामाबादचे (तेलंगणा) चेअरमन वनमाला सत्यम यांच्या हस्ते, राज्याच्या विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी कर्नाटक राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शंभू लिंगप्पा बेंगळुरू, जिल्हा बार असोसिएशन चंद्रपूरचे माजी सचिव अ‍ॅड. सुरेश तालेवार, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार (मुंबई), कार्याध्यक्ष सुनील पाटणकर (वर्धा), सरचिटणीस बालाजी पवार (नांदेड), कोषाध्यक्ष गोरख मिलारे (पंढरपूर), सल्लागार शिवगोंडा खोत व मान्यवरांची उपस्थिती होती.

चंद्रपुरात दै. 'पुढारी'चा सन्मान

महाराष्ट्रातील वृत्तपत्र विकेत्यांचे एकमेव शिखर संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या चंद्रपुरात पार पडलेल्या अधिवेशनात राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेल्या आणि त्यांच्याकरिता उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या दै. 'पुढारी'चा सन्मान याप्रसंगी सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. राज्याच्या लोकलेखा समितीने अध्यक्ष तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दै. 'पुढारी'चे सहायक वितरण व्यवस्थापक अमर पाटील यांनी मानचिन्ह घेऊन सन्मान स्वीकारला.

विक्रेत्यांप्रति असलेल्या 'पुढारी'च्या बांधिलकीचे कौतुक

वृत्तपत्र विक्रेता हा वर्तमानपत्राचा कणा आहे. याकडे दुर्लक्ष न करता त्यांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हे वर्तमानपत्रांच्या हिताचे आहे. दै. 'पुढारी'ने वृत्तपत्र विक्रेत्यांचे नेहमीच हित जोपासले आहे. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याचे काम केले आहे. विक्रेत्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांचेही हित जोपासले आहे. याच उल्लेखनीय कार्याचे कौतुक अधिवेशनादरम्यान करण्यात आले. याप्रसंगी अमर पाटील यांनी उल्लेखनीय अशा काही ठळक उपक्रमांचे विश्लेषण केले. कोरोना काळात जीवाची पर्वा करता वृत्तपत्र वितरणाचे काम करणार्‍या विक्रेत्यांचा कोरोना योद्धा म्हणून 'पुढारी'ने गौरव केला.

'फादर्स डे'निमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा त्यांच्या मुलांकडून सन्मान करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलींच्या लग्नकार्यासाठी आर्थिक मदत केली. वृत्तपत्र वाटप करताना शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा डॉ. अब्दुल कलाम यांचे वारसदार म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. नेहमीच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून वृत्तपत्र विक्रेत्यांना मान, सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. योगेश जाधव यांनी नेहमीच पुढाकार घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पन्नासे यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले संघटनांचे पदाधिकारी, एजंट, पत्रकार बंधू आदींची उपस्थिती होती.

विक्रेता वृत्तपत्र क्षेत्रात रक्तवाहिनीचे काम करतो : आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : सोन्यासारखे मूलद्रव्य प्राप्त व्हायला तप्त अग्नीतून जावे लागते. तसेच तुम्ही जगातील सर्वात उष्ण शहरात आला आहात. इथून जाताना तुम्हीसुद्धा घडून जाल, असा मला विश्वास आहे, असे उद्गार विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते.आ. मुनगंटीवार म्हणाले, शरीरामध्ये रक्तवाहिनी ज्या पद्धतीने कार्य करते, तेच काम आयुष्यामध्ये वृत्तपत्र विक्रेता संघटना करीत आहे. वाघ आपले लक्ष्य पराक्रमाने पूर्ण करतो. तसेच पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता संघसुद्धा आपले लक्ष्य पराक्रमाने पूर्ण करतो. जसे सूर्योदयाला कधीही उशीर होत नाही तसेच वृत्तपत्र घरी यायला वृत्तपत्र विक्रेता कधीही उशीर करीत नाही, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT