पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून सुरू होणारा अमेरिका दौरा ऐतिहासिक ठरणारा असून, जागतिक महासत्तेकडून भारतीय पंतप्रधानांना मिळणार्या अनोख्या सन्मानाचे दर्शन यानिमित्ताने जगाला घडणार आहे. पाच दिवसांच्या दौर्यात पहिले तीन दिवस अमेरिका आणि त्यानंतरचे दोन दिवस मोदी मिस्रला भेट देतील. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून मोदी अमेरिका दौर्यावर जात आहेत, त्याचवेळी मिस्रचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल-सीसी यांनी त्यांना काहिराला येण्यासाठी खास निमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या दौर्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हरिस यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ स्वतंत्रपणे मेजवान्यांचे आयोजन केले आहे.
'व्हाईट हाऊस'मध्ये मोदींचे रेड कार्पेट स्वागत होणार असून, तिथेच बायडेन यांनी स्टेट डिनरचे आयोजन केले आहे. स्टेट डिनर ही अमेरिकेची अधिकृत मेजवानी असते आणि तिचे आयोजन व्हाईट हाऊसमध्येच केले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी दुसर्या देशाच्या राष्ट्रप्रमुखासाठी या मेजवानीचे आयोजन करीत असतात. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीसमोर मोदी यांचे भाषण हाही भारताच्या द़ृष्टीने गौरवाचा क्षण ठरणार आहे. पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी विराजमान झाल्यापासून जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे आणि त्याचेच प्रत्यंतर या दौर्याच्या निमित्ताने येत आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबरच अमेरिकेतील भारतीयही उत्सुक असून, त्यांनी स्वागताची जोरदार तयारी केली आहे. जागतिक पातळीवरील राजकारण नवनवी वळणे घेत असताना अमेरिकेसारख्या महासत्तेने भारतीय पंतप्रधानांसाठी अंथरलेल्या लाल गालिचामुळे एकूण जागतिक राजकारणातील भारताचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
रशिया-युक्रेन युद्धामध्ये एकीकडे अमेरिका रशियाविरुद्ध कठोर भूमिका घेत असताना भारताने मात्र अमेरिकेच्या मागे फरफटत न जाता रशियाशी आपले पूर्वांपार संबंध जपण्यास प्राधान्य दिले आणि रशियाशी संबंध टिकवण्याच्या नादात युक्रेनशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घेतली. रशियाशी सहकार्याच्या भारताच्या भूमिकेमुळे अमेरिका नाराज होणे स्वाभाविक असले, तरी भारताने त्याची पर्वा न करता आपला स्वतंत्र बाणा जपला. या पार्श्वभूमीवर मोदींना अमेरिकेत मिळणार्या सन्मानाकडे पाहिल्यानंतर भारताचे महत्त्व किती वाढले, हे लक्षात येऊ शकते. जागतिक पातळीवर भारताकडे विश्वगुरू म्हणून पाहिले जाते, याची प्रचितीच यानिमित्ताने येते. मोदींच्या पुढाकाराने जागतिक पातळीवर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याच पुढाकारामुळे जगभरात योगाचा प्रसार होत असून, मोदीही दरवर्षी त्यामध्ये उत्साहाने सहभागी होत असतात. अमेरिकेतील योगदिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार असून, याचदिवशी ते अमेरिकेतील भारतीय नागरिकांना संबोधित करतील. त्यांच्या नेतृत्वाने अनेक देशांतील नागरिकांना आकर्षित केले आहे, त्यापैकीच अमेरिकाही. त्यामुळे दौर्याचे महत्त्व वाढले आहे.
भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा पुढचा अध्याय काय असेल, याकडे जगाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दौर्याच्या निमित्ताने वॉशिंग्टनहून काय संदेश दिला जातो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर पोहोचतील, असा विश्वास अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित संधू यांनी व्यक्त केला असून, दोन्ही देशांमधील समझोत्याचा पुढचा टप्पा यातून साकार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सौहार्द नैसर्गिक असून, दोन्ही देशांमध्ये आरोग्यविषयक बाबींवर काम सुरू आहे. केवळ भारत आणि अमेरिकेपुरताच नव्हे, तर हा दौरा जगासाठी हिताचा असल्याचा दावाही करण्यात येत आहे. येत्या सप्टेंबरमध्ये होणार्या जी-20 शिखर संमेलनाचे यजमानपद भारताकडे असल्यामुळेही या दौर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, या दौर्यात काही संरक्षणविषयक महत्त्वपूर्ण करार होणार आहेत. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर मोदी आणि बायडेन यांची आतापर्यंत पाचवेळा भेट झाली असून, या दौर्याच्या निमित्ताने होणारी त्यांची भेट सहावी असेल. या काळात जगातील दोन प्रमुख देशांच्या प्रमुखांचे संबंध घट्ट मैत्रीमध्ये परावर्तित झाले असल्याचे पाहायला मिळते.
अमेरिका दौर्याइतकाच मिस्रचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मिस्रचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल-सीसी ऑक्टोबर 2015 आणि 2016 मध्ये भारतात आले होते. त्यानंतर यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिले, त्यावेळी दोन्ही देशांची मैत्री द़ृढ करण्याच्या द़ृष्टीने काही महत्त्वपूर्ण करार झाले आणि अनेक मुद्द्यांवर सहमतीही घडून आली. परस्परांच्या हितांशी संबंधित द्विपक्षीय मुद्द्यांवर त्यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांमधील मैत्री व्यूहरचनात्मक पातळीवर खास संबंधांमध्ये बदलण्यासंदर्भातही त्यावेळी चर्चा झाली होती, त्यामुळे मोदींच्या मिस्र दौर्यामध्ये त्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध मौलिक असून, सध्या सात अब्ज डॉलरचा व्यापार दोन्ही देशांमध्ये होतो, तो येत्या पाच वर्षांमध्ये बारा अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याच्या द़ृष्टीने यावेळी निर्णय होऊ शकतो.
दोन्ही देशांच्या सैन्यांनी यावर्षी जानेवारीमध्ये एकत्रितपणे सराव केला होता. मिस्रने भारताकडून तेजस लढाऊ विमाने, रडार, सैन्यासाठी हेलिकॉप्टर आणि आकाश मिसाईल सिस्टीम खरेदी करण्यामध्ये रस दाखवला होता. आजवर अन्य देशांकडून शस्त्रे खरेदी करणारा भारत आता शस्त्रांचे उत्पादन करीत असून, 42 देशांना शस्त्रांची विक्री केली जाते. मिस्रकडे आणखी एक शस्त्र खरेदीदार म्हणून भारताकडून पाहिले जात आहे. आयआयटीच्या धर्तीवरील एक भारतीय उच्च शिक्षण संस्थाही आपल्या देशात स्थापन करण्यासाठी मिस्र उत्सुक आहे. एकीकडे मिस्रला विविध पातळ्यांवर भारताची गरज आहे, त्याचप्रमाणे भारतासाठी आफ्रिकेमध्ये गुंतवणूक करण्याचा रस्ता मिस्रपासून तयार होऊ शकतो. त्याद़ृष्टीनेही मोदींच्या या दौर्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.