पाण्याशिवाय काहीच नाही. म्हणूनच त्याला जीवन म्हणतात. मंगळ ग्रहापासून चंद्रापर्यंत अब्जावधी डॉलर खर्च करून मोहीम राबविली आणि त्यातही पाण्याचाच शोध घेतला गेला, कारण जेथे पाणी, तेथेच जीवन; मात्र आपण दुसर्या ग्रहावर पाण्याचा शोध घेत असताना पृथ्वीवर पाणी हे अक्षरश: वाया घालवत आहोत. एका अर्थाने भूतलावर पाण्याचा अमर्यादित स्रोत असल्याचे गृहीत धरून पाण्याचा बेसुमार वापर करत आहोत.
आजघडीला पाण्याच्या पुरवठ्याबाबत जरा बंगळूरच्या लोकांना विचारून पाहा. भारताच्या या हायटेक सिटीत लाखो, कोट्यवधीचे पॅकेज घेऊन लोक काम करतात. तेथे सर्वकाही आहे; पण पाणी नाही. कोट्यवधीच्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक पाण्याच्या टँकरची वाट पाहताना दिसतात. गेल्यावर्षी शहरात महापूर येऊनही तेथील भूजल पातळी कमालीची घसरली आहे. पाणीपातळी एवढी घसरली आहे की, तेथील कोणतीच विंधन विहीर, सबमर्सिबल किंवा हातपंपाला पाण्याचा शोध घेता आला नाही. कावेरी नदीपासून पाणी येत होते; मात्र तेथेही दुष्काळ पडला आहे. शहरात पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने केला जात आहे. टँकरचे भाव दुप्पट-तिप्पट झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी रांगा लागत आहेत. पाणी वाया घालवल्यास दंड ठोठावला जात आहे. अजूनही कडक उन्हाळा सुरूच झालेला नाही आणि आता हे हाल होत आहेत. सूर्यदेव आग ओकतील तेव्हा काय होईल? सध्या ज्यांच्या घरात नळाला पाणी येत आहे, त्यांच्यासाठी बंगळूर हे भविष्यातील चित्र आहे. हे चित्र दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहराने 2015 ते 2018 या काळात अनुभवले आहे. या शहरातील पाणीपातळी शून्यावर पोहोचली होती. निसर्गालाच दया आली आणि 2018 नंतर चांगला पाऊस पडला आणि पाण्याचा ओघ सुरू झाला. अखेर सध्याच्या काळात ज्या रीतीने हवामान बदल होत आहे, ते पाहता निसर्गाची कृपा आपल्यावर किती दिवस राहील, हे सांगता येत नाही.
दि. 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिवस साजरा केला जाईल. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व समजावे यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. बंगळूरमध्येही हा दिवस साजरा केला जात असेल आणि यावर्षीही साजरा होईल. मात्र यावेळी स्थानिक नागरिक पाण्याचा धडा बर्यापैकी शिकलेले असतील. टेक्नॉलॉजी सेक्टरच्या कंपन्यांचा बंगळूर गड मानला जातो. आज टेक्नॉलॉजीचा अर्थ डेटा आहे. त्यामुळे या शहरातील आणि अन्य टेक शहरांतील आयटी कंपन्यांचे कर्मचारी हे 'डेटा' म्हणजे माहितीच्या जंजाळात जागतात आणि झोपतात. वास्तविक डेटाशी प्रेमच नाही, तर त्याच्याशी साता जन्माची गाठही बांधली गेली आहे. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा पीसी हे नव्या काळातील जोडीदार आहेत. डेटाशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे. डेटाची तहान भागतच नाही; मात्र डेटाचीही स्वत:ची तहान आहे, ही बाब अनेकांना ठाऊक असेलच असे नाही. डेटाला पाणी हवे असते आणि तेही भरपूर. कधी कधी नदीएवढे. पाणी वाचवणे म्हणजे केवळ नळ बंद करणे नव्हे; कारण तोच एकमेव उपाय आपल्याला ठाऊक होता. एक लक्षात घ्या, मोबाईल, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर व्हॉट्स अॅप, गुगल, फेसबुक वापरत असताना दुसरीकडे नकळतपणे पाण्याचादेखील खर्च होत आहे.
वास्तविक डेटा सेंटरमध्ये हजारो-लाखो पीसीसारखी मशिन काम करत असतात आणि त्यात डेटा साठवलेला असतो. या मशिनना थंड करण्यासाठी पाण्याची गरज भासते. त्यामुळे अधिक डेटा प्रक्रिया केल्यास संगणकही तितक्याच प्रमाणात उष्ण होईल. परिणामी, त्याला थंड ठेवण्यासाठी पाण्याची गरज भासणारच. जसजसे गुगल आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्सची स्पर्धा वाढेल, तसतशा अन्य टेक कंपन्या नवीन डेटा उभारण्याच्या शर्यतीत स्पर्धा निर्माण करत आहेत. अशा स्पर्धेतून त्यांच्याकडून पाण्याचा अधिकाधिक वापर केला जाईल. गुगलदेखील पाण्याचा वापर करत आहे आणि विशेष म्हणजे त्यातील बहुतांश पाणी हे पिण्यायोग्य आहे. म्हणजेच मशिन थंड ठेवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे; मात्र असे करणारे गुगल एकमेव नाही. फेसबुकची कंपनी मेटाने 2022 मध्ये 2.6 दशलक्ष क्युबिक मीटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर केला.
केवळ डेटाच का? बाटलीबंद पाणी विक्री करणार्या कंपन्यांचीही हीच स्थिती आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात 2030 पर्यंत बाटलीबंद पाण्याची वार्षिक विक्री 500 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. या पाण्याचा जमिनीतून उपसा केला जात आहे. आपल्या देशाचा विचार केल्यास पाण्याचा व्यवसाय करणार्या कंपन्या दरवर्षी 1.33 कोटी क्युबिक मीटर पाणी जमिनीतून बाहेर काढत आहेत. बाटली आणि बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय हा सुमारे 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे.
आता पाण्याचे फिल्टर करणार्या व्यवसायाकडे पाहू. सध्या तर 'आरओ'चा जमाना आला आहे. सामान्य फिल्टर तर कदाचित कोठे दिसत असतील. आरओ मशिन हे एक लिटर पाणी स्वच्छ करण्यासाठी पाच लिटर पाणी नाल्यात सोडून देते. अर्थात, ही बाब नेहमीच चालणारी नाही. जेव्हा नळाचे पाणी बंद होईल, तेव्हा काय होईल याचा विचार करा. पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापला असला तरी त्यापैकी तीन टक्केच पाणी वापरण्यायोग्य आहे. या तीन टक्क्यांतही दोन टक्के बर्फ आणि ग्लेशियर रूपातून पाणी आहे. अशी गंभीर स्थिती असतानाही लोकांना पाण्याचे महत्त्व कळून चुकलेले नाही. नद्या तर अशुद्ध झाल्या आहेत आणि तलावही कोरडे पाडले आहेत. एका अहवालात 2032 पर्यंत जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात राहण्यास प्रवृत्त होईल, असे म्हटले आहे. एका अंदाजानुसार, 2050 पर्यंत जगातील प्रत्येक चौथी व्यक्ती ही पाण्याच्या समस्येने ग्रस्त असेल. एकूण पाण्याच्या स्रोतांपैकी 29 टक्के स्रोत हे अधिक वापर केल्याने दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊ थांबले आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.