Latest

मूलभूत विज्ञानाची बिकट वाट..!

Arun Patil

गुणवत्तेचा ओढा बौद्धिकद़ृष्ट्या आव्हान आणि समाधान देणार्‍या क्षेत्रांकडे जावा की आर्थिकद़ृष्ट्या स्थैर्य व सुखासीनता देणार्‍या क्षेत्रांकडे, याचे आदर्श उत्तर व व्यवहार्य उत्तर वेगवेगळे असू शकते. परंतु, त्याची सांगड घालता आली, तर मूलभूत विज्ञानासारख्या क्षेत्रात भक्कम पायाभरणी करून आपण देश म्हणून दीर्घकालीन प्रगतीचे मार्ग प्रशस्त करू शकतो. आजच्या (11 मे) राष्ट्रीय तंत्रज्ञानदिनी तंत्रशिखराकडे नेणारा मूलभूत विज्ञानाचा पाया भक्कम करण्यास आपण सारे सज्ज होऊ या..!

'बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको। संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको॥' असा शाहीर अनंत फंदी यांचा एक फटका गेली सुमारे दोन शतके मराठी समाजाला जगण्याचा सरळ, सालस मार्ग दाखवत आला आहे. कठोर शब्दांत समाजाला वास्तवाची जाणीव करून देणारा काव्यप्रकार म्हणून त्याला फटका म्हणतात. अनंत फंदी हे माझा जन्म झाला त्या नगर जिल्ह्यातील संगमनेरचे. ज्या उत्तर पेशवाईत त्यांनी काव्य लेखन केले, तेव्हाच्या संदर्भात अशा फटक्याची गरज सहज लक्षात येते. परंतु, कालगती अशी असते की, कालचे वर्तमान हे आज इतिहास होताना कधी धडा देणारे ठरते, तर कधी संदर्भहीन, अनाकलनीय आणि विपरीतही!

तंत्रज्ञान हे परिवर्तनामागील एक प्रमुख कारण ठरत आहे. आज (11 मे ) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जात आहे. अटल टिंकरिंग लॅब ही यंदाच्या या दिनाची संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. देशातील दहा लाख मुलांमध्ये नवसंकल्पनांची बीजे रोवली जावीत, या उद्देशाने या प्रयोगशाळांची संकल्पना प्रत्यक्षात आली. आज देशभरातील दहा हजार शाळांमध्ये या प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

मी स्वतः आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा भारतातच राहण्याचा आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारलेला असावा, असा विचार माझ्या मनात घोळत असे. माझ्या त्या प्रयत्नांना दिशा मिळत गेली आणि आज माझी प्राज इंडस्ट्रीज ही जगभरातील औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नावाजली जाणारी कंपनी झाली आहे. प्राज मॅट्रिक्स ही आमची स्वतःची संशोधन व विकास संस्था आमच्या कंपनीच्या वाटचालीचा कणा ठरली आहे. मूलभूत विज्ञानातील शिक्षण घेतलेले तरुण तंत्रज्ञ व विषयतज्ज्ञ तेथे कार्यरत आहेत.

खरे तर, मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान असा भेद मी करू इच्छित नाही. उपयोजित विज्ञान हेच फक्त तंत्रज्ञान विकास व त्यातून साधता येणार्‍या प्रगतीची गुरुकिल्ली ठरते, असेही मी मानत नाही. कारण, मूलभूत विज्ञान संशोधन हादेखील भविष्यात त्या क्षेत्रातील उपयोजित संशोधनाचा पाया ठरतो आणि ते संशोधन सर्वसामान्य घटकाशी जोडण्यासाठी तंत्रज्ञान विकासाचे निमित्त ठरते. म्हणजे मूलभूत विज्ञान हा ज्या साखळीचा प्रारंभबिंदू आहे, त्याचा अंतिम बिंदू तंत्रज्ञान विकास हा आहे. त्यामुळेच आजच्या तंत्रज्ञान दिनानिमित्त मी विज्ञान संशोधनाकडील कल वाढण्याची गरज प्रकर्षाने मांडत आहे.

माझे स्वतःचे शिक्षण झालेल्या संस्था आणि माझे आजोबा, स्वातंत्र्यसेनानी दादा चौधरी यांच्या नावाने नगरमध्ये चालणारी शाळा अशा निमित्तांनी मी शालेय विद्यार्थ्यांच्या संपर्कात येतो. त्यांचा कल, करिअरच्या संभाव्य दिशा यांचा कानोसा घेतो, तेव्हा करिअरच्या कालच्या बिकट वाटा आज वहिवाटा झाल्या आहेत, की त्याहीपेक्षा सरधोपट, कालच्या पिढीने घेतलेल्या करिअरविषयीच्या निर्णयांचे संदर्भ आजही आपल्याला धडा देऊ शकतात की संदर्भहीन, या प्रश्नांची चर्चा सातत्याने व्हायला हवी आणि त्यातून समंजस व स्वतंत्र निर्णयाप्रत येता आले पाहिजे, असा विचार माझ्या मनात बळावतो. मूलभूत विज्ञानातील संशोधनाच्या आज बिकट वाटणार्‍या वाटा आपल्या देशात वहिवाटा कधी होणार आणि त्या वहिवाटांवरून वाटचाल करणारे सर्व संबंधित घटक प्रगतीचे किरण अंगावर झेलताहेत, हे चित्र आपल्याला कधी पाहायला मिळणार, या प्रश्नाच्या उत्तरातून आपल्या देशाच्या विकासाची पायाभरणी होणार आहे.

कसे साध्य केले आहे चीनने परिवर्तन?

चीनमधील सर्वोच्च प्रतिनिधीगृह असणार्‍या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनात पंतप्रधान ली कचिआंग यांनी मार्च 2023 मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार, संशोधन व विकास कार्यावरील चीनचा खर्च त्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) 2.55 टक्के इतका वाढला आहे. अमेरिकेत हे प्रमाण 2.8 टक्के, तर भारतात ते 0.6 टक्के आहे. जागतिक नवता निर्देशांकात (वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स 2022) चीनने अकरा वर्षांपूर्वीच्या छत्तीसाव्या स्थानापासून अकराव्या स्थानापर्यंत उडी मारली आहे. भारत या यादीत चाळीसाव्या स्थानी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वावलंबनातून विकास साधण्यास आपला देश कटिबद्ध असल्याचे कचिआंग यांनी या अधिवेशनात ठामपणे सांगितले आहे.

ही तौलनिक आकडेवारीदेखील संशोधन व विकास याबाबतीत भारताच्या परिस्थितीचे बोलके चित्र मांडते. आपला देशाभिमान कदाचित हे मान्य करण्यास आढेवेढे घेऊ शकतो. कोव्हिड-19च्या लाटा थोपवण्यासाठी चीनमध्ये तयार केलेल्या लसींपेक्षा भारतीय बनावटीच्या लसीने अधिक प्रभावी कामगिरी केली, या वस्तुस्थितीचा दाखलाही आपण त्यासाठी देऊ शकतो. परंतु, गुणात्मक शिखर गाठण्यासाठी संख्यात्मक पायाभारणी आवश्यक असते. ती चीनने केली आहे, हे नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर आपण भारतातील स्थितीचा आढावा घेऊ. देशातील 10 हजार विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक कल जाणून घेऊन एका संस्थेने 2019मध्ये त्याचे निष्कर्ष मांडले होते. त्यानुसार आपल्याकडील 14 ते 21 वयोगटातील 93 टक्के विद्यार्थ्यांना फक्त सात क्षेत्रांतील करिअरच्या संधींची कल्पना आहे. त्यातही 23.53 टक्के मुलांनी अभियांत्रिकी शाखेतील करिअरला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. लेखापालन व वित्त व्यवस्थापन, संगणक उपयोजन आणि माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा, व्यवस्थापन, डिझाइनिंग आणि विधी (वकिली) ही ती क्षेत्रे होती. या विद्यार्थ्यांनाही दोष देता येणार नाही. कारण, उदरनिर्वाहासाठीच्या 'बाजारपेठे'तील मागणी आणि पुरवठा यांच्या मिलनबिंदूवर त्यांना उभे राहायचे आहे.

– डॉ. प्रमोद कुंभार,
(लेखक प्राज इंडस्ट्रीजचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT