Latest

राजर्षी शाहूंच्या कार्यामुळेच महाराष्ट्र पुरोगामी

Arun Patil

राजर्षी शाहू महाराजांचे विलक्षण चारित्र्य सामान्य माणसाला उकलण्यासारखे नव्हते. महाराजांनी एका बाजूला ज्योतिरावांचे सामाजिक कार्य पुढे नेले, तर दुसर्‍या बाजूला डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व उभे केले. महाराष्ट्राला आज पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते, याचे मोठे श्रेय शाहू छत्रपतींना आहे. त्यांनी केलेल्या सुधारणा मूलगामी स्वरूपाच्या होत्या.

राजर्षी शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतिपथावर आणणे सोपे होते. असे वरकरणी वाटत असले, तरी त्यांनाही विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले गेले.

महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांची चर्चा करताना 'फुले-शाहू-आंबेडकर' असा जोड उल्लेख करण्याची प्रथा आहे. याचं कारण असं की, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी, आगरकर यांनी पुरस्कारलेल्या सुधारणांचे बहुतांश लक्ष्य हे उच्चवर्णीय लोक होते आणि त्या सुधारणा बर्‍याच अंशी कौटुंबिक होत्या. याउलट महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सुधारणा व्यापक आणि मूलगामी होत्या.

तेव्हाच्या सामाजिक स्थानाचा विचार करता ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शुद्रातिशूद्र जातीत मोडणारे होते; पण शाहू महाराजांनी एका बाजूला ज्योतिरावांचे सामाजिक कार्य पुढे नेले, तर दुसर्‍या बाजूला डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व उभे केले. ज्योतिरावांचे विचार क्रांतिकारक होते. त्यांनी समाजसुधारणांचा घातलेला पाया भक्कम होता; पण साधनसामग्री आणि यंत्रणांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे जोतिरावांचे कार्य अपेक्षेइतके पुढे सरकू शकले नाही.

शाहू महाराज स्वतः सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्याकडे यंत्रणा आणि साधनसामग्री यांचा तुटवडा नव्हता. तसेच शिवछत्रपतींचे वंशज म्हणून महाराष्ट्रात त्यांचे एक वेगळेच स्थान होते. त्याचाही त्यांना लाभ झाला आणि दुसरे असे की, ज्योतिरावांच्या वेळी महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज सामाजिक सुधारणांविषयी काहीसा उदासीन होता. तो शाहू महाराजांमुळे सक्रिय बनला.

'वेदोक्त प्रकरण' त्याकाळी चांगलेच गाजले. यामुुळेच शाहू महाराजांना पुरोहित शाहीचे स्वरूप आणि सामर्थ्य समजले आणि तिच्याशी झुंज द्यायला ते सज्ज झाले. खरे पाहता टिळक आणि शाहू महाराज हे दोन महापुरुष एकमेकांना पूरक ठरले असते, तर महाराष्ट्राचा इतिहासच बदलला असता; पण तसे झाले नाही. समाजसुधारणांचा राजकीय सुधारणांशी संघर्ष, ही जणू महाराष्ट्रातली ऐतिहासिक अपरिहार्यताच.

ज्योतिरावांचा सत्यशोधक समाज हा वेदांना झिडकारणारा तर दयानंदांचा आर्य समाज वेदांना प्रमाण मानणारा, पण महाराजांनी दोन्ही पंथांना आश्रय दिला. दोन्ही पंथ परस्परविरोधी असल्यामुळे महाराजांनाही त्रास झालाच; पण जातीविरोधी सुधारणा त्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या.

महाराजांनी परंपरागत कुलकर्णी वतन बंद करून त्याऐवजी नोकरदार तलाठी नेमण्याचा धडाका लावला. अस्पृश्यांनी सतत कष्टाची आणि कमी प्रतिष्ठेची कामे करायची आणि कुलकर्ण्यांनी जमाबंदीसारखे महत्त्वाचे काम करायचे? हे त्यांना पटत नव्हते. ही रीत त्यांनी बंद केली.

अस्पृश्यांना जी क्षेत्रं माहीत नाही, त्या क्षेत्रांची दारे त्यांच्यासाठी उघडी करणे, हे शाहू महाराजांना महत्त्वाचे वाटत होते. कोणत्याही परिवर्तनासाठी कायदा आवश्यक असतो; पण तो प्रत्येकवेळी पुरेसा ठरतोच असे नाही. त्यांनी वागणुकीतून काही धडे घालून दिले.

प्रजेला समान हक्क देण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, मुलांना शाळेत न पाठवणार्‍या पालकांना दंड करण्याची तरतूद कायद्यात केली. गुणवान विद्यार्थी हेरून महाराज त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत. पुढे नोकरी मिळेल, अशी व्यवस्थासुद्धा करत. कोल्हापूरला शिक्षणाची सोय आहे म्हटल्यावर बाहेरचे अनेक विद्यार्थी तिथे यायला लागले. सहशिक्षण एकवेळ ठीक होते; पण एकत्र राहणे, जेवणे या गोष्टी तेव्हाच्या जातीग्रस्त समाजाच्या पचनी पडल्या नव्हत्या. महाराजांनी मग जातीनिहाय वसतिगृह काढायला जागा दिल्या. इमारती दिल्या. देणग्याही दिल्या. शिक्षण संस्था काढायला तसेच त्या चालवायला उत्तेजन दिले.

स्वराज्याला त्यांचा विरोध नव्हता. ब्रिटिशांची मदत घेऊन खालच्या वर्गासाठी मूलभूत सुधारणा करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू होता. समाजातील खालच्या जाती स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यांचे नेते त्यांच्या जातीतून निर्माण झाले पाहिजेत. त्यांना कुणाच्या तोंडाकडे पाहायला लागू नये, असे छत्रपतींचे धोरण होते. त्या धोरणाचे एक द़ृश्यफळ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे नेतृत्व. संस्थानात 50 टक्के नोकर्‍या मागासवर्गीयांना राखीव ठेवण्याच्या जाहीरनाम्यात ते म्हणतात, 'मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण-प्रभू-शेणवी-पारशी आणि दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा.' म्हणजे त्यांना विशिष्ट जात अभिप्रेत नसून पुढे गेलेल्या सर्व जाती अभिप्रेत होत्या, असे म्हणता येईल. राखीव जागांच्या बाबतीतसुद्धा पात्रतेबाबतीत त्यांचा आग्रह होता. महाराष्ट्राला आज पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जावे, याचे मोठे श्रेय शाहू छत्रपतींना आहे.

डॉ. सदानंद मोरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT