Latest

सहस्रकाच्या जडणघडणीचे नायक!

Arun Patil

28 नोव्हेंबर रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी मुंबईत एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख युगपुरुष असा करताना गांधीजी हे महापुरुष होते, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. एखादी व्यक्ती किती महान आहे, हे ठासून सांगण्यासाठी त्या विद्यमान व्यक्तीपेक्षा उत्तुंग व्यक्तीशी तुलना करावी लागते, तेव्हाच त्याचे महत्त्व अधोरेखित होते, हा जगाचा अलिखित नियम आहे. अहिंसेच्या प्रभावी अस्त्राने गांधीजींनी जग जिंकले! दुसर्‍या जागतिक महायुद्धावेळी बर्लिनच्या रेडिओवरून ब्रिटिशांना आव्हान देताना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम गांधीजींचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी' असा गौरव केला होता. उपराष्ट्रपतींच्या भाषणातून या स्मृती आणखी ताज्या झाल्या आहेत.

भारतीय शतकाचे जडणघडणकर्ते शोधताना जगभरातील मोठे इतिहासकार प्रथम पसंती देतात, ते शांती आणि अहिंसेचा मूर्तिमंत पुतळा महात्मा गांधी यांना. जगाला शांती, अहिंसा, त्याग आणि नैतिकतेचे धडे देऊन भारतीय शतकाला नवा आकार देणार्‍या या पंचाधारी फकिराची सहस्रकातील महान आशियाई म्हणून निवड करण्यात आली आणि जगानेही त्यास मान्यता दिली. आता महात्मा गांधी ही व्यक्ती राहिली नाही, तर जगभर तो एक विचार म्हणून पुढे आला आहे. तथापि, काही दुष्ट प्रवृत्तींद्वारे चित्रपट, नाट्यसंहिता आणि विखारी भाषणांतून गांधींना वारंवार मारण्याचे प्रयत्न केले जातात. आताही तसे प्रयत्न सुरूच आहेत; पण गांधी काही केल्या मरत नाही. कारण गांधीविचार जगभरात तळागाळात खोलवर रुजला आहे. देशाचे संवैधानिक प्रमुख राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि कित्येकदा पंतप्रधानांनाही गांधी विचाराचा गौरव करावा लागतो, यातच या विचाराचे अमरत्व दडले आहे.

स्वातंत्र्यपूर्व चळवळीत खंडप्राय भारतातील राज्यांनी देशाला अनेक महान नेते दिले. बिहारचे सुपुत्र, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संपूर्ण बिहार नेता मानत असे. मात्र राजेंद्र प्रसाद गांधीजींना आपला नेता मानत. ज्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी कुराणावर भाष्य करून खळबळ उडवून दिली होती, ते डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना मक्का मदिनेत मोठी प्रतिष्ठा होती. ब्रिटिश भारतातील मुसलमान आझाद यांना आपला नेता मानत होते. तेच आझाद गांधीजींना आपला नेता मानत असत.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले; परंतु तेसुद्धा गांधीजींना आपला नेता मानत असत. आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर, गांधी यांचा 'राष्ट्रपिता' म्हणून जाहीर गौरव केलेला आहे. तात्पर्य, महात्मा गांधी अशा अनेक नेत्यांचे नेते होते. गांधीजी सेवा, त्याग, देशप्रेम, समर्पण या सर्व उत्तम गुणांचा समुच्चय होते. त्यांनी विश्वशांती आणि अहिंसेचा कृतिशील संदेश जगाला देऊन तो प्रयोग त्यांनी अशा कालखंडात यशस्वी करून दाखवला, ज्या काळात जाती-धर्माच्या नावाने धर्ममार्तंड हिंसाचार, रक्तपात घडवत होते. अमानवीय पद्धतीने हत्या केल्या जात होत्या.

या सहस्रकाची जडणघडण करणार्‍या गांधीजींच्या कार्यावर अमेरिकन हिस्टॉरिकल सोसायटीने गौरवलेले प्रसिद्ध इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांनी तीन पुस्तके समर्पित केली आहेत. 'गांधी बिफोर इंडिया' (2013), 'गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड' (2018) आणि 'इंडिया ऑफ्टर गांधी' (2007) ही व्यावसायिक खपाचा उच्चांक गाठणारी ती तीन पुस्तके. सहस्रकाच्या जडणघडणीमध्ये गांधीजींसोबतच पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांचेही योगदान अमूल्य मानले जाते.

रामचंद्र गुहा यांनी 2010 साली प्रकाशित केलेल्या 'मेकर्स ऑफ इंडिया' या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन राय, महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, ताराबाई शिंदे, सय्यद अहमद खान, खुदा बक्ष, रामास्वामी पेरियार, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आदींच्याही कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे. जगाच्या नकाशात भारताचे स्थान नेमके कोठे आहे, हे शोधायला या महान राष्ट्रपुरुषांनी पाश्चात्त्यांना भाग पाडले. भारताच्या जडणघडणीत घटनातज्ज्ञ, वैज्ञानिक,शिक्षक, समाजसुधारक यांचा जेवढा वाटा आहे तेवढेच योगदान समर्पित सेनानींचेही आहे. कारण त्यांच्या आहुतीमुळेच आपल्याला सुरक्षेचे भक्कम कवच लाभले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT