महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि जीवनाची दिशा ठरवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची धडपड खर्या अर्थाने सुरू झाली, असे म्हणता येईल. पूर्वीच्या काळी दहावीच्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व होते, बदलत्या काळात ते कमी झाले. म्हणजे, दहावीच्या गुणांचा उपयोग चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यापुरता किंवा डिप्लोमा वगैरेची स्वप्ने पाहणार्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित उरला. ज्यांना भव्य-दिव्य स्वप्ने पाहायची आहेत, त्यांच्यासाठी बारावीची परीक्षा महत्त्वाची बनली. कारण, बारावीच्या गुणांवरच आयुष्याची पुढील दिशा ठरत होती. आता बारावीच्या परीक्षेचे तेही महत्त्व कमी झाले. कारण, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा होऊ लागल्या, त्यामुळे बहुतेक विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करण्यासाठीच अधिकाधिक वेळ देऊ लागले. त्यासाठीच्या खासगी शिकवणी वर्गांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. अशा खासगी शिकवणी वर्गांची एक इंडस्ट्रीच उभी राहिली.
अनेक शहरांच्या नावाने पॅटर्न विकसित होऊ लागले आणि शिक्षणाचे खर्या अर्थाने बाजारीकरण झाल्याचे चित्र समोर आलेच त्यामुळे प्रचलित शिक्षणव्यवस्थेच्या मर्यादाही समोर आल्या. शिक्षणाचा दर्जा, दिशा आणि शिक्षणपद्धतीतील त्रुटीही दिसून आल्या. इतके सगळे होऊनही दहावी आणि बारावीची परीक्षा स्वतंत्र परीक्षा मंडळामार्फत होत असल्यामुळे त्या परीक्षेला संबंधित विद्यार्थी, त्यांचे पालक, नातेवाईक आणि त्यांच्या शाळा-महाविद्यालयांच्या द़ृष्टीने महत्त्व असतेच. राज्य मंडळाचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात 2.97 टक्के घट झाली. त्याचे कारणही मंडळाने स्पष्ट केले. मागील परीक्षा वेगळ्या वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना 70, 80 आणि 100 गुणांसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. 75 टक्के अभ्यासक्रमांवर परीक्षा घेण्यात आली होती.
परंतु, यंदा 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली आणि कोणताही वाढीव वेळ देण्यात आला नव्हता. खरे तर विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही वर्षाची परीक्षा तितकीच महत्त्वाची असते. मात्र, आपल्या एकूण व्यवस्थेने बोर्डाच्या परीक्षेचे अवास्तव महत्त्व वाढवून ठेवले. त्यात पालक मंडळी मुलांवर अपेक्षा लादून आपली स्वप्ने त्यांच्यामार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. बारावीच्या परीक्षेची ही अवस्था पाहून कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी, बारावीची परीक्षा केवळ शैक्षणिक नव्हे, तर सामाजिक प्रश्न बनली असल्याचे मत व्यक्त केले होते. या सामाजिक प्रश्नाला शैक्षणिक परिप्रेक्ष्यात आणून मुलांवरचा अतिरिक्त दबाव कमी करण्याचे आव्हान आगामी काळात आपल्यासमोर आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
बारावीची परीक्षा हे बहुतांश विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण असते. विद्यार्थी कोणत्या विद्याशाखेकडे, कोणत्या अभ्यासक्रमाकडे जाणार आहे आणि त्याच्या आयुष्याची दिशा काय असणार आहे, याचा निर्णय बहुतांश याच टप्प्यावर होणार असतो. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा दोनच अभ्यासक्रमांकडे पूर्वी विद्यार्थ्यांचा ओढा असायचा आणि तिथे प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असायची. प्रवेश परीक्षेवर आता तिथले प्रवेश ठरत असल्यामुळे बारावीच्या गुणांचे महत्त्व तुलनेने कमी झाले आहे.
शिवाय, वैद्यकीय, अभियांत्रिकीच्या पलीकडे नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी समर्थ बनवणार्या अनेक अभ्यासक्रमांचा विस्तार झाला. शिवाय, कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जाण्याऐवजी प्रशासकीय सेवेचा पर्याय निवडून त्याद़ृष्टीने तयारी करणार्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. काळाच्या प्रवाहात गुणवत्तेची परिमाणेही बदलली आहेत. पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचा आनंद मानणार्या सामाजिक परिस्थितीतील मुले आता नव्वदीला गवसणी घालताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना ऐंशी, नव्वदच्या घरात गुण मिळत आहेत किंवा शाळा-महाविद्यालयांचे निकालही 98, 99 किंवा 100 टक्के लागत आहेत. परंतु, हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर त्याचे जे दूरगामी परिणाम होताहेत, त्याचाही विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
एवढ्या प्रमाणात गुण मिळताहेत म्हणजे आधीच्या पिढीच्या तुलनेत मुलांची गुणवत्ता वाढली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर होकारार्थी आणि नकारार्थीही देता येऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या भवितव्याबाबत पालक संवेदनशील बनल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देऊ लागले. मुलांना अभ्यासाची अनेक साधने उपलब्ध होऊ लागली. खासगी शिकवणी वर्गांचा विस्तार वाढला. एकीकडे हे होत असताना शाळांच्या पातळीवरही विद्यार्थ्यांचे आकलन वाढवण्याऐवजी परीक्षेत गुण मिळवण्याचे कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाऊ लागला. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यालाही उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण मिळवण्याचे तंत्र शिकवले जाऊ लागले. त्याचे प्रतिबिंब निकालामध्ये दिसून येऊ लागले. पूर्वी मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण होत, त्यातून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रश्न तीव्रतेने समोर येत होते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे अलिखित धोरण राबवले जाऊ लागले.
ग्रामीण भागात या निकालाचे विपरीत परिणाम दिसतात, ते म्हणजे या मुलांचे आजचे बहुतांश पालक म्हणजे वडील किमान बारावी ते पदवीपर्यंत आणि आई दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झालेले असतात. आपल्या मुलाला साठ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले म्हणजे हुशार आहे म्हणजे तो विज्ञान शाखेकडे जायला पाहिजे, असा कल वाढू लागला. त्यातून ग्रामीण भागात विज्ञान शाखेच्या विनाअनुदान तुकड्यांचा धंदा वाढू लागला. कला शाखा ओस पडू लागल्या. फुगवलेल्या गुणांची मुले विज्ञान शाखेकडे गेल्यामुळे तिथे त्यांची वाढ मर्यादितच राहिली आणि कशीतरी पदवी मिळाल्यानंतर ती कोणत्याही स्पर्धेसाठी पात्र ठरत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आपल्या अपेक्षा लादण्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात नाही ना, याचाही विचार यानिमित्ताने होण्याची आवश्यकता आहे. या गुणवंतांचे आणि गुणवत्तेचे कौतुक.