Latest

सप्तपदीची अर्थपूर्णता

दिनेश चोरगे

सप्तपदी हे रोज चालते
तुझ्या सवे ते शतजन्मीचे हो,
माझे नाते

पी. सावळाराम लिखित लता मंगेशकर यांचे हे गीत वर्षानुवर्षे घराघरांत ऐकले जाते. प्रसिद्ध मराठी कथाकार वि. वि. बोकील यांच्या कथेवर आधारित 'सप्तपदी' हा चित्रपट 1962 मध्ये लोकप्रिय झाला होता. लग्नसंस्था हा एक करार आहे, अशा द़ृष्टीने विवाहोत्सुक मुली आणि मुले त्याकडे पाहतात. हिंदू संस्कृतीने विवाह हा पवित्र संस्कार मानला आहे, असा विचार काही ते करत नाहीत. नवर्‍याच्या कठीण प्रसंगी पत्नीला मातेची भूमिका घ्यावी लागते आणि तरुणपणी प्रीतीचा उत्कट आविष्कार करून ती त्याची प्रियाही होते. जीवनपटावर दोघांना बरोबरच पावले टाकायची असतात. देह दोन, पण जीव एकच. एकाचा आनंद दुसर्‍याच्या डोळ्यांत तरळतो. एकाचे दुःख दुसर्‍याच्या चेहर्‍यावर ओघळते. सप्तपदी म्हणजे कधीही न संपणार्‍या प्रवासाची सुरुवात, असे या चित्रपटाचे कथासूत्र होते. हे सर्व कथन करण्याचे कारण म्हणजे हिंदू विवाह हा एक संस्कार असून, हा नाचगाण्याचा, भोजनाचा किंवा मद्यपानाचा कार्यक्रम नव्हे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच सप्तपदी आणि अन्य विधींशिवाय हिंदू विवाह स्वीकारार्ह नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नुकतेच एका घटस्फोटाच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. नागरत्नम यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या जोडप्याचा विवाह हिंदू कायद्यानुसार परिपूर्ण नाही, असा निष्कर्ष व आपले यासंदर्भातील स्पष्टीकरण न्यायमूर्तींनी नोंदवले. अर्थातच हा निकाल हिंदू विवाह कायद्यानुसार झालेल्या विवाहासंदर्भातील आहे. विशेष विवाह कायदा (स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट) वेगळा असून, तो हिंदूंसकट सर्वच धर्मीयांना लागू आहे. त्यासंदर्भात कोणत्याच धर्माच्या विवाह विधींचा संबंध येत नाही. न्यायालयाच्या मते, अलीकडील काळात देशाच्या काही विशिष्ट भागात लग्नावेळी डीजेच्या तालावर डान्स करायचा, कॉकटेल पार्टी ठेवायची, चार-चार दिवस लग्नसोहळा साजरा करायचा, असे घडत असते. तरुणाईला तर मौजमजा करायला निमित्तच हवे असते; परंतु विवाह ही त्यापलीकडील एक गंभीर अशी बाब आहे.

सप्तपदी व परंपरेतील अन्य विधी झाल्याविना तो हिंदू विवाह अधिकृत ठरणार नाही, असे न्यायालयाला वाटत आहे. याचा अर्थ असा की, नोंदणी पद्धतीने जरी लग्न केले, तरी हिंदू धर्मातील व्यक्ती असतील, तर ते विधिवत झाले, तरच तो 'अधिकृत हिंदू विवाह' गणला जाईल. तसेच वादविवादांच्या प्रकरणात असे विधी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात, असेही महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. व्यावसायिक वैमानिक असलेल्या एका जोडप्याने सप्तपदी, मंत्रोच्चार अशा हिंदू पद्धतीने विवाह केला नसताना, हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी हे भाष्य केले. पाश्चात्त्य देशांत घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड आहे. भारतातही उदारीकरणानंतर एक नवमध्यमवर्ग उदयास आला. त्या वर्गाकडे भरपूर पैसा आल्यामुळे अनेकांची जीवनपद्धती स्वैर व उथळ बनली. बदलत्या काळात आधुनिक विचार आत्मसात केले पाहिजेत, कालबाह्य रूढी-परंपरांना मूठमाती द्यायला हवी; परंतु विवाह हा काही भातुकलीचा खेळ नाही. चुकीचा हट्ट धरून हुंडा, भेटवस्तूंची मागणी करणे किंवा वस्तूंची देवाणघेवाण करणे म्हणजेही विवाह नाही, अशी टिप्पणी करून, चुकीच्या रीतिरिवाजांवर न्यायालयाने नेमके बोट ठेवले.

हिंदू विवाह कायद्यांतर्गत, विवाह वैध ठरण्यासाठी केवळ प्रमाणपत्र पुरेसे नाही, तर विवाह सोहळा आणि विधीही महत्त्वाचे आहेत. एखाद्याच्या लग्नात या गोष्टींचा अभाव असेल, तर त्या जोडप्याला वैवाहिक दर्जा देता येणार नाही. मंत्रोच्चारात अग्नीसमोर सप्तपदी पार पडल्यानंतरच हिंदू विवाह वैध मानला जाईल, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. हिंदू कोड बिल म्हणजे हिंदू कायद्याच्या मसुद्याअंतर्गत 1955 मध्ये हिंदू विवाह कायदा स्थापित झाला. हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा व हिंदू दत्तक विधान आणि निर्वाह कायदा हे 1956 मध्ये संमत झाले. हिंदू कायदा पद्धतीचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कायदे मांडले गेले. हिंदू लोकांचे वैयक्तिक आयुष्य, विशेषतः समाजातील लग्नव्यवस्था, तिची कायदेशीर वैधता आणि अवैधतेच्या अटी यांना नियमांच्या चौकटीत बसवणे, हा त्यामागील हेतू होता. भारतीय राज्यघटनेच्या 44 व्या कलमानुसार, जैन, बौद्ध, शीख यांनाही यात समाविष्ट केले आहे. विवाहाच्या अटी विभाग पाचमध्ये नमूद केल्या आहेत. हा कायदा बहुपत्नीकत्वाला प्रतिबंध करतो. विवाहासाठी वधूचे वय 18 आणि वराचे 21 असेल, तरच ते विवाहास पात्र ठरतात. कायद्याच्या सातव्या कलमात विवाहाच्या विधी व प्रथांची नोंद घेतली गेली आहे. लग्न करणार्‍या दोन्ही व्यक्तींपैकी एकाच्या समुदायाच्या विधी, परंपरा आणि विवाह साजरा करण्याच्या पद्धतीनुसार विवाह केला जावा, असे त्यात नमूद आहे.

विवाहबद्ध होणार्‍या दोघांनीही पवित्र अग्नीच्या साक्षीने सात पावले एकत्र चालणे अपेक्षित आहे. जेव्हा सातवे पाऊल पूर्ण होते, तेव्हाच विवाहाचा विधी पूर्ण झाला, असे मानले जाते. सप्तपदीमधून विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव सूचित केली जाते. वर आणि वधू हे विष्णू व लक्ष्मीस्वरूप असून, त्यांच्याप्रमाणे उदात्त व आदर्श गृहस्थाश्रम जीवन प्रारंभ करू, हे त्यातून सुचवले जाते. आता जबाबदारीने वागण्याचा संकल्प उभयता करतात. एकमेकांच्या कुटुंबातील जबाबदार्‍या स्वीकारणे आणि सांस्कृतिक परंपरेचा आदर करणे, निरोगी व दीर्घ आयुष्य जगण्याचे ठरवणे, समृद्ध अशा मानसिक व आध्यात्मिक जीवनासाठी एकत्र काम करणे, परस्परांशी प्रामाणिक राहणे वगैरे सात विविध आणाभाका घेण्याचीच ही परंपरा आहे. परंपरेतील चांगले ते घ्यावे, असे म्हटले जाते. सर्वोच्च न्यायालयाने तेच अधोरेखित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT