अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांत पाकिस्तानबाबत नाराजी आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानला पुन्हा युद्धाच्या खाईत लोटत आहे, असे तेथील जनतेला वाटते. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानवर अंकुश बसवावा, तसेच पाकिस्तानच्या सैनिकांवर आणि नागरिकांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी तालिबान शासकांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पाकने व्यक्त केली आहे; पण तालिबानकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्याने 'टीटीपी'चे मनोधैर्य आणखीच वाढले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) वर अंकुश बसवावा, अशी मागणी दोन वर्षांपासून पाकिस्तान अफगाणिस्तानकडे करत आहे. त्याचबरोबर तालिबान शासकांनी पाकिस्तानच्या सैनिकांवर आणि नागरिकांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही अपेक्षा पाकने व्यक्त केली आहे; पण तालिबानकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्याने 'टीटीपी'चे मनोधैर्य आणखीच वाढले आहे. परिणामी, दोन्ही देश युद्धजन्य स्थितीत येण्याची भीती वर्तविली जात आहे.
पाकिस्तानने 'टीटीपी' (तेहरिक-ए- तालिबान पाकिस्तान) संघटनेवर निर्बंध लादले आहेत. मात्र, ही दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या जमिनीवर विशेषत: उत्तर-पश्चिम भागात अफगाणिस्तान सीमेवर सातत्याने हल्ले घडवून आणत आहे. अलीकडेच उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात एका सैनिकी चौकीवर स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे आत्मघाती हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-फुरसान-ए-मोहम्मद गटाने घेतली. अर्थात, पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकार्यांच्या मते, या संघटनेत मोठ्या संख्येने 'टीटीपी'चे सदस्य सामील आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले. त्यामुळे अफगाण तालिबान नाराज झाला.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलुच यांच्या मते, दहशतवादी संघटनांचा धोका हा पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे. प्रामुख्याने 'टीटीपी' आणि त्याच्या संबंधित आणखी संघटनांनी अफगाणिस्तानात बस्तान मांडले असून, तेथून पाकिस्तानवर हल्ले करत आहेत. या संघटना अफगाणिस्तानात सहजपणे वावरत असून, त्या पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहेत. याबाबत पाकिस्तान सरकारने तालिबान सरकारला वारंवार सूचना दिली असून, दहशतवादी संघटनांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशीही मागणी केली. तसेच अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवाद्यांसाठी करू नये, असेही आवाहन केले आहे. याउपरही हल्ले सुरूच असल्याचे बलुच यांनी सांगितले.
तालिबान सरकारने पाकिस्तान सरकारची 'टीटीपी'विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. 'टीपीपी'विरुद्ध बळाचा वापर केल्यास केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच नाही, तर संपूर्ण भागात अस्थिरता निर्माण होईल, असे तालिबानचे म्हणणे आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे सरकारी अधिकारी, प्रामुख्याने सैनिकी अधिकारी हे अफगाणिस्तानच्या सीमेवरील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. अफगाणिस्तानच्या सीमाभागात हवाई हल्ले पाहता, पाकिस्तान तालिबान शासकांवर नाराज असल्याचे दिसून येते. अफगाण सरकार 'टीटीपी'विरुद्ध कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. तसेच 'टीटीपी'कडून अफगाणिस्तानातून पाकिस्तानवर हल्ले केले जात आहेत. गेल्या दोन वर्षांत तालिबानशी अनेकदा चर्चा झाली आहे; मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही.
'टीटीपी'च्या प्रमुख मागणीनुसार पाकिस्तान सरकारने देशाच्या उत्तर पश्चिम भागातील असणार्या सैन्यात कपात करावी; पण ज्या भागात सरकारचे नियंत्रण कमी राहते, तेथे 'टीटीपी'कडून हल्ले झाले आहेत. 'टीटीपी' ही सुन्नी बंडखोर आणि कट्टरपंथीय गटाची संघटना आहे. पाकिस्तान सरकारविरुद्ध 2007 पासून त्यांचा रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. अर्थात, 'टीटीपी'चा थेट संबंध अफगाण तालिबानशी नाही; मात्र ते त्यांना त्यांचे म्होरके मानतात. पाकिस्तानने 2008 मध्ये 'टीटीपी'वर बंदी घातली. देशातील अनेक हल्ल्यांना 'टीटीपी' जबाबदार राहिला आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक भीषण हल्ला 2014 च्या पेशावरमधील एका शाळेवर झाला होता. या हल्ल्यात सुमारे 150 जण मारले गेले होते. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेनेदेखील 'टीटीपी'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत 'टीटीपी'विरुद्ध अनेक सैनिक मोहिमा राबवल्या. मात्र, आता दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तान तयारी करत आहे. यात अफगाणिस्तानातील 'टीटीपी'च्या ठिकाणांवर हल्ले करणे याचा समावेश आहे. या कारवाईमुळे अफगाण तालिबान हा नाराज होऊ शकतो आणि याकडे युद्ध स्वरूपातील कारवाई म्हणून पाहू शकतो. काबुलमधील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांच्या मते, आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महाशक्तीविरुद्ध लढण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. अफगाणिस्तान आपल्या भागात कोणत्याही प्रकारचे हल्ले करण्याची परवानगी देत नाही. पाकिस्तान हा आपल्याच भागातील प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत आहे आणि त्यासाठी त्याने अफगाणिस्तानला जबाबदार धरू नये. पाकिस्तानकडून होणारे हवाई हल्ले हे गंभीर परिणामाची नांदी ठरू शकते.
पाकिस्तान आता 'टीटीपी'च्या धोक्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या समस्येची पाळेमुळे एवढी खोलवर रुजलेली आहेत की, त्याला आता गंंभीर वळण मिळाले आहे. त्यामुळे या कठीण स्थितीचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानला कौशल्यपूर्वक रणनीतीचा वापर करावा लागणार आहे. युद्धजन्य स्थितीतून वाचण्यासाठी सरकारला पावले उचलावी लागतील आणि युद्ध हे दोन्ही बाजूंसाठी विनाशकारी ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील अंतर्गत राजकीय तणावामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. अर्थात, ते पूर्णपणे युद्ध नसले तरी परिणाम त्याच्यासारखेच राहू शकतात. अर्थात, 'टीटीपी' ही पाकिस्तानातील मोठी गंभीर समस्या आहे आणि अफगाण सीमेवर सैन्य कारवाई केल्याने कदाचित पाकिस्तानच्या सैनिकी अधिकार्यांना जनतेचा पाठिंबा मिळू शकतो. तसेच 'टीटीपी'च्या मुद्द्यावर तालिबानमध्ये दोन गट पडले आहेत.
अफगाणिस्तानचे तालिबान सरकार 'टीटीपी'विरुद्ध कडक कारवाई करू इच्छित नाही. यामागचे कारण म्हणजे या कारवाईमुळे संघटनेत फूट पडू शकते. त्याचबरोबर पाकिस्तानचे दहशतवादी 'इसिस'सारख्या संघटनेत सामील होऊ शकतात. अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांत पाकिस्तानबाबत नाराजी आहे. पाकिस्तान हा अफगाणिस्तानात हिंसाचार माजवत आहे आणि हिंसा करणार्यांना समर्थन देतो, असे वाटते. पाकिस्तान अफगाणिस्तानला पुन्हा युद्धाच्या खाईत लोटत आहे, असे अफगाणिस्तानच्या जनतेला वाटते. याप्रमाणे तालिबानचे नेते या गोष्टीला हवा देत आपले सरकार किती चांगले आहे, हे सांगू शकतात.