गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांनी नवे विक्रम प्रस्थापित केले. निफ्टी व सेन्सेक्सने गतसप्ताहात अनुक्रमे एकूण 183.75 अंक व 542.30 अंकांची वाढ दर्शवून आजपर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर म्हणजेच 21894.55 अंक व 72568.45 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टीमध्ये एकूण 0.85 टक्के तर सेन्सेक्समध्ये 0.75 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टी व सेन्सेक्सला विक्रमी पातळीवर पोहोचविण्यात आयटी क्षेत्र तसेच नैसर्गिक वायू/खनिज तेल उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी मोठा हातभार लावला. सप्ताहदरम्यान सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये हिरो मोटोकॉर्प (9.9 टक्के), एचसीएल टेक (7.5 टक्के), इन्फोसिस (5.2 टक्के), रिलायन्स इंडस्ट्रीज (5.1 टक्के), एल अँड टी माईंड ट्री (4.9 टक्के) या कंपन्यांचा समावेश होतो. तसेच सर्वाधिक घट दर्शविणार्या समभागांमध्ये नेस्ले इंडिया (-4.4 टक्के), बजाज फिनसर्व्ह (-3.4 टक्के), डिव्हीन लॅब (-3.3 टक्के), एक्युएल (-2.9 टक्के), यूपीएल (-2.8 टक्के) यांचा समावेश होतो. रुपया चलनाचा विचार करता रुपया चलन सलग आठव्या दिवशी मजबूत होऊन शुक्रवारअखेर डॉलरच्या तुलनेत 11 पैसे मजबूत होऊन 82.90 रुपया प्रतिडॉलर स्तरावर बंद झाले.
देशातील एफएमसीजी क्षेत्रातील मोठी बातमी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस कंपनीने कॅपीटल फूडस कंपनी 5100 कोटींना विकत घेतली. कॅपीटल फूडस कंपनीचे चिंग्स चायनीज आणि स्मिथ अँड जोन्स या उत्पादनांच्या लोकप्रिय नाममुद्रा (ब्रँडस) आहेत. या 5100 कोटींपैकी टाटा सुरुवातीला कॅपीटल फूडसची 75 टक्के इक्विटी हिस्सा विकत घेणार, तर उरलेला 25 टक्के हिस्सा पुढील तीन वर्षांत विकत घेतला जाणार. आरोग्यवर्धक चहा आणि खाद्य उत्पादने बनवणार्या ऑरगॅनिक इंडिया कंपनीचे अधिग्रहणदेखील टाटा कन्झ्युमरने 1900 कोटींना केले.
डिसेंबर महिन्यात देशातील किरकोळ महागाई दर (रिटेल इन्फ्लेशन) 5.69 टक्क्यांवर पोहोचला. मागील चार महिन्यांचा हा उच्चांक आहे. अन्नधान्य महागाई दर (फूड इन्फ्लेक्शन) नोव्हेंबरमध्ये असलेल्या 8.7 टक्क्यांवरून 9.53 टक्क्यांवर पोहोचला तसेच देशाच्या औद्योगिक प्रगतीचे निदर्शक असलेला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रॉडक्शन (आयआयपी) नोव्हेंबरमध्ये मागील आठ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 2.4 टक्क्यांवर खाली आला.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 2.5 टक्के घटून 11058 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीतील कर्मचारी संख्या 5680 नी घटली. कंपनीचा महसूल मागील तिमाहीच्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी वधारून 60583 कोटींवर पोहोचला.
देशातील दुसर्या क्रमांकाची मोठी कंपनी इन्फोसिसचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत 1.7 टक्के घटून 6106 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूल मागील तिमाहीच्या तुलनेत 0.4 टक्के घटून 38821 कोटी झाला.
केंद्र सरकारकडे जमा होणारा थेट कर (Direct Tax) एकूण उद्दिष्टाच्या 81 टक्क्यांवर पोहोचला. 10 जानेवारीअखेर केंद्र सरकारला निव्वळ 14 लाख 70 हजार कोटींचा थेट कर मिळाला. मागील वर्षाची या कालावधीशी तुलना करता कर संकलनात 19.4 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारला एकूण 18 लाख 23 हजार कोटींचा थेट कर महसूल अपेक्षित आहे. या गतीने कर संकलन झाल्यास अपेक्षित कर संकलनापेक्षा यावर्षी 1 लाख कोटींचा अधिकचा कर संकलित होणे अपेक्षित आहे. 1 एप्रिल 2023 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान सरकारने करदात्यांना 2 लाख 48 हजार कोटींचा करपरतावा (Tax Refund) दिला आहे.
म्युच्युअल फंड उद्योगाचा नवा विक्रम ः डिसेंबर 2023 मध्ये भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचे व्यवस्थापनअंतर्गत भांडवल मूल्य (Asset Under Management) 50 लाख कोटींपर्यंत पोहोचले. तसेच एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूकदेखील आजपर्यंतच्या विक्रमी पातळीवर म्हणजे 17611 कोटींवर पोहोचली. दहा वर्षांपूर्वी केवळ 10 लाख कोटींचे भांडवल बाजारमूल्य असणारा म्युच्युअल फंड उद्योगाने व्यवस्थापनअंतर्गत भांडवल मूल्यामध्ये 5 पटींची वाढ दर्शवली. आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचे बालसुब्रमण्यम यांच्या म्हणण्यानुसार पुढील सात वर्षांत भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचे व्यवस्थापन अंतर्गत भांडवल बाजारमूल्य 100 लाख कोटींचा आकडा पार करेल.
देशातील महत्त्वाची आयटी कंपनी एचसीएल टेकचे चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर. एचसीएल टेकचा निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 13.5 टक्के वधारून 3832 कोटींवरून 4350 कोटींवर गेला. तसेच कंपनीचा महसूल 6.7 टक्के वधारून 26672 कोटींवरून 28446 कोटींवर पोहोचला.
चीनमध्ये मंदी कायम. चीनमधील भांडवल बाजार मागील 5 वर्षांच्या न्यूनतम स्तरावर पोहोचला. चीनमधील निर्देशांक सीएसआय 300 ने गतसप्ताहात फेब्रुवारी 2019 मध्ये असलेली न्यूनतम पातळीदेखील तोडली (brerakdown). कोरोना संकट आणि पाश्चात्त्य देशांनी घातलेली विविध आर्थिक बंधने यामुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे चीनमधील बांधकाम व्यवसायातील उद्योग आणि पर्यायाने त्यांना कर्ज पुरवलेल्या बँका दोन्ही अडचणीत सापडल्या आहेत.
बजाज ऑटोच्या संचालक मंडळाने 4000 कोटींच्या समभाग पुनर्खरेदी प्रस्तावाला मान्यता दिली. 10 हजार रुपये प्रतिसमभाग किमतीवर पुनर्खरेदी होणार. यापूर्वी जून 2022 मध्ये 4600 रुपये प्रतिसमभाग स्तरावर 2500 कोटींची समभाग पुनर्खरेदी झाली होती.
विप्रो या आयटी क्षेत्रातील कंपनीचा चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 1.8 टक्क्यांनी वधारून 2694 कोटी झाला. महसुलात 1.4 टक्क्यांची घट होऊन महसूल 22094 कोटी झाला. कंपनीतील कर्मचार्यांची संख्या मागील 12 महिन्यांत 21875 नी कमी झाली.
5 जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 5.9 अब्ज डॉलर्सनी घटून 617.3 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.