Latest

लवंगी मिरची : सर्वांना भरभरून शुभेच्छा!

Arun Patil

गुढीपाडव्याच्या सर्वांना आभाळभर शुभेच्छा. या सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. चांगल्याने वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस, म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी आरंभ केलेले उपक्रम भरभराटीस येतात, अशी भावना असल्यामुळे हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस वर्षातील अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त समजला जातो. जे-जे लोक आजच्या दिवशी नवीन व्यवसायाला प्रारंभ करत आहेत, त्यांना गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

सासूबाईंना सुनांकडून आणि सुनांना सासवांकडून प्रेम मिळावे, यासाठी शुभेच्छा. आई आणि सून या दोघींमध्ये अत्यंत चांगला ताळमेळ बसून घरातील वातावरण प्रसन्न आणि मंगलमय राहावे, यासाठी आईच्या नवर्‍याला आणि सूनबाईच्या पतीला शुभेच्छा. भावजयांना नणंदांकडून कमी टोमणे मिळावेत, यासाठी शुभेच्छा. जावयांना सासुरवाडीकडून भरपूर आशीर्वाद आणि पुरेपूर भेटवस्तू मिळाव्यात, यासाठी शुभेच्छा. यावर्षी धोंड्याचा महिना आला आहे. प्रोत्साहनपर भत्ता म्हणून मिळणारा धोंडा सासुरवाडीकडून मोठ्या आकाराचा आणि मोठ्या किमतीचा मेळावा, यासाठी तमाम विवाहीत पुरुषांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

डॉक्टरांना भरपूर पेशंट मिळावेत आणि रुग्णांना उत्तम आरोग्य मिळावे, यासाठी शुभेच्छा. सरकारी कर्मचार्‍यांना जुनी किंवा नवी, कोणतीतरी पेन्शन मिळावी, यासाठी शुभेच्छा! महानगरपालिका, नगरपालिका आणि यावर्षी होणार्‍या सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळावे, यासाठी सर्व उमेदवारांना आभाळभर शुभेच्छा.

आता तुम्ही म्हणाल निवडून तर एकच जण येणार आहे, मग सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा कशासाठी? मान्य आहे. त्यासाठी पराभूत उमेदवारांना पुन्हा पाच वर्षांनंतर येणार्‍या निवडणुकीमध्ये यश मिळण्यासाठी शुभेच्छा आणि विजयी उमेदवारांना भरपूर विकास कामे करून पुन्हा निवडून येण्यासाठी शुभेच्छा. दुचाकी वाहने चालवणार्‍या ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक नागरिकाला पाठीचे मणके शाबूत राहण्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!

सध्या वेगवान आणि गतिमान हे दोन्ही शब्द आणि दोन दाढीधारी आणि एक गुळगुळीत दाढीच्या नेत्यांचे फोटो अंगभर डकवून घेतलेल्या एस.टी. बसच्या सर्व ड्रायव्हर, कंडक्टर्स यांना नियमित आणि भरपूर पगारासाठी शुभेच्छा. 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.तून मोफत प्रवास करण्यासाठी शुभेच्छा! राज्यातील सर्व महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्यासाठी पुरेपूर शुभेच्छा.

तमाम लेखकांना प्रतिभा शक्तीला पूर येण्यासाठी शुभेच्छा आणि आलेल्या साहित्यिक पुराला सामोरे जाणार्‍या वाचकांना उत्तम आणि दर्जेदार वाचायला मिळावे, यासाठी शुभेच्छा! चित्रपट पहिल्याच दिवशी हिट व्हावेत, यासाठी सर्व हिरोंना शुभेच्छा आणि भरपूर कपडे वापरण्यास मिळावेत, यासाठी अभिनेत्रींना शुभेच्छा.

खंडणी आणि धमकी यापासून संरक्षण मिळावे, यासाठी बिल्डरांना शुभेच्छा. शिक्षकांना शुभेच्छा आहेत आज्ञाधारक विद्यार्थी मिळावेत, यासाठी आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत, तळमळीने शिकवणारे शिक्षक मिळावेत यासाठी. ट्रकचालक आणि मोठे वाहन मोठी वाहने चालवणारे ड्रायव्हर्स यांना रात्रीच्या वेळी डुलकी न लागण्यासाठी शुभेच्छा! आमचे वाचक, जाहिरातदार, सहकारी लेखक यांना अंगणभर पसरणार्‍या उजेडासारख्या आभाळभर शुभेच्छा!

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT