Latest

कर्नाटकात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Arun Patil

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. गेल्या दोन आठवड्यांत संपूर्ण राज्याने 'इलेक्शन फिव्हर'चा अनुभव घेतला. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, आता घरोघरी प्रचार करता येणार आहे. अखेरच्या दिवशी मोजक्याच ठिकाणी राज्याबाहेरील नेत्यांच्या सभा झाल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडुपी येथे रोड शोमध्ये भाग घेतला; तर राहुल गांधींनी बीएमटीसी बसमधून प्रवास करून नागरिकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.

10 मे रोजी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचाराचा दणका उडवून दिला होता. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला; तर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सरतेशेवटी सोनिया गांधी यांनी जोरदार प्रचार केला. तिसरा पक्ष असलेल्या निजदच्या प्रचाराची धुरा ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडा यांनी सांभाळली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बीएमटीसी बसमधून प्रवास केला. प्रवाशांशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजप हा भ्रष्टाचारात अडकलेला पक्ष असून, काँग्रेसला सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात काही आश्वासने दिली आहेत. त्यांची तत्काळ पूर्तता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला प्रवाशांशी त्यांनी चर्चा केली. काँग्रेसला बहुमत मिळाल्यास महिलांना मोफत प्रवासाची सोय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रचाराची रणधुमाळी थांबली; उत्सुकता वाढली

निपाणी : बहुचर्चित निपाणी विधानसभा मतदारसंघात बुधवारी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी थांबली. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यावर आता आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. भाजपच्या उमेदवार मंत्री शशिकला जोल्ले, काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी नेटाने जोर लावला आहे.

भाजपची सद्दी संपली : डी. के. शिवकुमार

बंगळूर ः सर्वेक्षण करणार्‍या संस्थांवर विश्वास नाही. काँग्रेसच पूर्ण बहुमताने कर्नाटकात सत्तेत येईल व थोड्या थोडक्या नव्हे तर 141 जागा जिंकेल, असा पुनरुच्चार कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला. भाजप सरकारच्या पापाचा घडा भरला असून, कर्नाटकची जनता त्यांच्या पदरात झुकते माप टाकणार नाही, याची खात्री असल्याचेही ते म्हणाले.

'सोनिया गांधींविरुद्ध गुन्हा दाखल करा'

नवी दिल्ली ः काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हुबळीमधील भाषणादरम्यान 'सार्वभौमत्व' शब्दाचा वापर केल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजप माध्यमप्रमुख अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. शुक्रवारी काँग्रेसने एक ट्विट करीत सोनिया यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यातील भाषणावर भाजपने आक्षेप घेतला आहे. सोनिया यांनी मुद्दाम 'सार्वभौमत्व' शब्दाचा वापर केल्याचे भूपेंद्र यादव म्हणाले.

निवडणूक आयोगाने मागविला खुलासा

'कर्नाटकचे सार्वभौमत्व' असा उल्लेख काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. तसेच चूक दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरून काँग्रेसवर प्रखर हल्ला चढवला होता.

पूर्ण बहुमताने भाजपच सत्तेत येणार ः अमित शहा

बंगळूर ः कर्नाटकातील जनतेला डबल इंजिन सरकारचे महत्त्व पटले आहे, त्यामुळे राज्यात पूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुस्लिमांना देण्यात आलेले आरक्षणच मुळात घटनाबाह्य होते, असे म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अमित शहा यांनी राज्यभर झंझावाती प्रचार दौरे केले, जाहीर सभा घेतल्या आणि रोड शोमध्ये सहभाग घेतला. सोमवारी प्रचार संपल्यानंतर एका वृत्तवााहिनीशी बोलताना त्यांनी कर्नाटकातील जनतेचा उत्साह पाहता राज्यात पुन्हा भाजपच सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, डबल इंजिन सरकारचा फायदा काय हे येथील जनतेला पटले आहे. डबल इंजिनच्या मदतीने विकासाच्या वेगवान रथावर स्वार व्हायला कर्नाटकची जनता उत्सुक आहे, हे मला सर्व ठिकाणी जाणवले. त्यामुळे त्याचे प्रत्यंतर मतपेटीतून समोर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT