Latest

चीनमध्‍ये ‘झिरो कोविड’ विरोधातील आंदोलनाचा भडका, १३ शहरांमध्‍ये तीव्र निदर्शने; लॉकडाउन हटविण्‍याची मागणी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमध्‍ये वाढत्‍या कोरोना रुग्‍णसंख्‍येमुळे झिरो कोविड पॉलिसी राबवली जात आहे. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांवर कडक निर्बंध लादले गेले असून, याविरोधात मागील तीन दिवस चीनमधील विविध शहरांमध्‍ये जनता रस्‍त्‍यावर उतरली आहे. राजधानी बीजिंगमध्‍ये सुरु झालेले आंदोलनाचा वणवा आता १३ शहरांपर्यंत पोहचला आहे. लाठीमार आणि अटकेच्‍या कारवाई होत असताना नागरिक आपल्‍या मागणीवर ठाम आहेत.  रविवारी ( दि. २७ ) रात्रभर आंदोलकांनी रस्‍त्‍यावर तीव्र निदर्शने केली. विविध शहरामध्‍ये लागू करण्‍यात आलेले लॉकडाउन हटवावे, राष्‍ट्रपती शि जिनपिंग यांनी राजीनामा द्‍यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्‍यात येत आहे.

६६ लाखांहून अधिक नागरिक लॉकडाउनमध्‍ये

चीनमध्‍ये मागील काही दिवस कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ होत आहे. २७ नोव्‍हेंबर रोजी देशभरात सुमारे ४० हजार नवे रुग्‍ण आढळले. यावर्षीची ही सर्वाधिक रुग्‍णसंख्‍या ठरली आहे. सध्‍या चीनमध्‍ये कोरोनाचे सुमारे तीन लाखांहून अधिक रुग्‍ण आहेत. रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात ठेवण्‍यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहे. कडक लॉकडाउनमुळे ६६ लाखांहून अधिक नागरिक घरांमध्‍ये बंद आहेत. तसेच दररोज होणार्‍या कोरोना चाचणीमुळेही नागरिक त्रस्‍त झाले आहेत. नियमभंग करणार्‍या नागरिकांवर प्रशासन कडक कारवाई करत आहे.

आगीच्‍या दुर्घटनेनंतर लॉकडाउनविरोधातील निदर्शने झाली तीव्र

दहा महिन्‍यांपूर्वी चीनमध्‍ये झिरो कोविड पॉलीसी जाहीर करण्‍यात आली होती. यामुळे नागरिक त्रस्‍त होतेच. मात्र २५ नोव्‍हेंबर रोजी शिंजियांगमध्‍ये एका इमारतीच्‍या १५ व्‍या मजल्‍यावर आग लागली. या दुर्घटनेत १० जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. झिरो कोविड पॉलीसीमुळे नागरिकांना इमारतीमधून बाहेर पडता आले नाही तसेच त्‍यांना वेळेत मदत मिळाली नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यानंतर बीजिंगमध्‍ये झिरो कोविड पॉलीसीविरोधात नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. यानंतर काही तासांमध्‍ये देशातील १३ शहरात या आंदोलनाचे लोण पसरले आहे.

१३ शहरांमध्‍ये सरकारचा तीव्र निषेध

बीजिंगमध्‍ये सुरु झालेले आंदोलन आता लॉन्चो, शिआन, चोंगकिंग, वुहान, झेंगझो, कोरला, होटन, ल्हासा, उरुमकी, शांघाय, नानजिंग, शिजियाझुआंग शहरांमध्‍ये पसरले आहे. गेली तीन दिवस या शहरांमधील नागरिक चीनमधील सत्ताधारी सरकारसह राष्‍ट्राध्‍यक्ष
शी जिगपिंग यांच्‍याविरोधात तीव्र निदर्शने करत आहेत. आंदोलक हातात फलक घेवून शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करत आहेत.

चीनच्‍या माध्‍यमांनी बाळगले मौन

लॉकडाउनविरोधातील देशातील विविध शहरांमध्‍ये आंदोलनाचे लोण पसरले असताना चीनच्‍या माध्‍यामांनी याबाबत मौन बाळगले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्‍लोबल टाइम्‍स'ने एका लेखात म्‍हटलं आहे की, पाश्‍चात्‍य माध्‍यम चीनच्‍या 'झिरो कोविड' पॉलीसविरोधात वातावरण तयार करत आहे. दरम्‍यान, आंदोलनाचे वार्तांकन करण्‍यासाठी गेलेल्‍या विदेशी पत्रकार एड लॉरेन्‍स यांना पोलिसांनी अटक केली. तसेच सुटकेपूर्वी त्‍यांना मारहाण करण्‍यात आल्‍याचा आरोप त्‍यांनी केला आहे. लॉरेन्‍स यांनी स्‍वत: पत्रकार असल्‍याचे सांगितले नव्‍हते. तसेच त्याच्याकडे ओळखपत्र नव्हते, असा खुलासा प्रशासनाने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT