File Photo  
Latest

New Hit and Run law : ट्रकचालकांचा विरोध असलेला काय आहे नवीन मोटार वाहन कायदा? जाणून घ्या सविस्तर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात (New Hit and Run law) ट्रक, डंपर आणि बसचालक रस्त्यावर उतरले आहेत. भाजीपाला, पेट्रोल, डिझेल यासारख्या मूलभूत वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहतूक सेवाही ठप्प झाल्या आहेत. देशातील विविध शहरांमध्ये लोकांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारचा काय आहे नवा कायदा जाणून घ्या…

नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात (New Hit and Run law) राज्यभरातील ट्रकचालकांनी पुकारलेल्या बेमुदत संपात (Drivers protest) इंधन वाहतुकीचे टँकरही उतरले आणि मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल पंपांवर सोमवारी पहिल्याच दिवशी टंचाईच्या भीतीने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मनमाडच्या पानेवाडी, नागपूर परिसरातील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांमधून इंधन व गॅसची वाहतूक करणारे तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त टँकर जागीच थांबल्याने राज्यातील विविध भागांत होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपत असल्याची माहिती मिळत आहे.

New Hit and Run law : काय आहे नवा कायदा?

हिट अँड रनबाबतच्या नव्या कायद्यानुसार, दोषीला जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा आणि तब्बल ७ लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. या जाचक तरतुदींमुळे ट्रकचालक आक्रमक झाले आहेत. आधीच्या कायद्यानुसार, हिट अँड रनमध्ये चालकाला पोलीस ठाण्यातून जामीन मिळत असे. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास दोषीला केवळ दोन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद होती. आता ही सोय राहिलेली नाही. हिट अँड रनबाबत केंद्र सरकारने नवे कायदे केले असून, त्याअंतर्गत ट्रक किंवा डंपर चालकाकडून अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला आणि तेथून पळून गेल्यास त्याला १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय ७ लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा. या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती. मात्र नवीन कायदा लागू झाल्यानंतर संबंधिताला आता दहा वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. मात्र, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्याची तरतूद आहे. ट्रक आणि डंपर चालक या कायद्याला विरोध करत आहेत. (New Hit and Run law)

New Hit and Run law : कायद्यात आधी आणि आता काय बदल?

आत्तापर्यंत अपघात झाल्यास वाहनचालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ म्हणजेच निष्काळजीपणे वाहन चालवणे, ३०४ अ म्हणजेच निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि ३३८ नुसार जीव धोक्यात घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला जात होता. मात्र नवीन कायद्यात घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकावर कलम १०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जर त्याने पोलिसांना किंवा दंडाधिकार्‍यांना माहिती दिली नाही तर त्याला १० वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही भरावा लागेल.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT