करिअरला प्राधान्य देणे, उशीर होणारे लग्न आणि उशिराने होणारी गर्भधारणा यासारख्या कारणांमुळे फायब्रॉईडस्च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. कामाचा वाढता व्याप व त्यामुळे वाढलेला तणाव आणि जीवनशैलीतील बदल हेही फायब्रॉईड प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे लक्षणे जाणवताच त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
गर्भाशयाच्या फायब्रॉईडस् ज्याला लेओमायोमास किंवा मायोमास देखील म्हणतात, या स्नायूंच्या गाठी आहेत ज्या स्त्रिच्या गर्भाशयात आढळू शकतात आणि फार क्वचितच त्या कर्करोगाच्या असू शकतात. स्त्रियांना गर्भाशयाच्या फायब्रॉईडस्चे निदान हे त्यांच्या प्रजनन वयामध्ये साधारणपणे 30 ते 40 या वयोगटात आढळून येतात. हल्ली 21-30 वयोगटातील महिलांमध्ये देखील फायब्रॉईड्स विकसित होणे अधिक सामान्य होत चालले आहे. फायब्रॉईडस् हे एकापेक्षा जास्त असू शकतात, बी च्या आकारापासून ते खरबुजाच्या आकारापर्यंत वाढू शकतात. सर्वच स्त्रियांना लक्षणे जाणवतील असे नाही; परंतु सामान्य लक्षणांमध्ये मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे, मूत्राशयावर दाब येणे, गुदाशयात वेदना होणे, कंबर दुखणे, बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे, 7 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारी मासिक पाळी, रक्ताच्या गुठळ्या आणि अति रक्तस्त्राव यांचा यामध्ये समावेश होतो. गर्भाशयाचे फायब्रॉईस् जीवघेणे नसतात; परंतु जास्त रक्तस्रावामुळे लाल रक्तपेशी (अॅनिमिया) नष्ट झाल्यामुळे थकवा येऊ शकतो. शिवाय महिलांना नैराश्य, चिंता, तणाव आणि भीतीचाही सामना करावा लागू शकतो.
फायब्रॉईडस् सर्व वयोगटांतील महिलांमध्ये आढळून येऊ शकतात; परंतु ते 30 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वीस वर्षांवरील आणि त्याहून अधिक वयाच्या स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती ही समस्या आढळते. फायब्रॉईड समस्येला विविध घटक कारणीभूत ठरतात.
एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, मासिक पाळीचे नियमन करणारे हार्मोन्स फायब्रॉईडच्या वाढीमध्ये भूमिका बजावतात. फायब्रॉईडस्चे निदान हे प्रजनन काळात अधिक प्रमाणात होते. तसेच रजोनिवृत्तीदरम्यान हार्मोन्सच्या पातळीतील चढ-उतार देखील फायब्रॉईडच्या समस्येस कारणीभूत ठरतात.
फायब्रॉईडस्चा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांमध्ये ते विकसित होण्याची शक्यता जास्त असते.
काही अभ्यासांनुसार लठ्ठपणा आणि लाल मांसाचे प्रमाण जास्त आणि फळे आणि भाज्यांचे सेवन कमी करणे यासारख्या घटकांमुळे फायब्रॉईडचा धोका वाढू शकतो, असे समोर आले आहे.
ज्या महिलांची गर्भधारणा झालेली नाही किंवा उशिराने गर्भ राहणे यामुळे देखील फायब्रॉईडस्चा होण्याचा धोका वाढू शकतो.
इन्सुलिनस वाढीस कारणीभूत घटक, जळजळ आणि रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या देखील फायब्रॉईडच्या विकासास कारणीभूत ठरू शकतात.फायब्रॉईड हे कर्करोग नसलेल्या गाठी असतात आणि रजोनिवृत्तीनंतर नैसर्गिकरीत्या त्यांचा आकार कमी होतो.