प्रियंका गांधी 
Latest

प्रियंका गांधी यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, काँग्रेस हायकमांडकडे आग्रह!

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीत जागांची ओढाताण सुरू झाली आहे. असे असतानाच आता विदर्भात 'बिगफाईट' पाहायला मिळणार का, अशी शक्यता आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी गांधी भूमी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी जेणेकरून मध्य भारतात काँग्रेसला फायदा मिळेल, अशी मागणी काँग्रेसमधीलच पदाधिकाऱ्यांनी पुढे केली आहे.

या शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा- गोंदिया लोकसभा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा तर अल्पसंख्यांक विभागाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नितीन राऊत यांनी रामटेक या राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला पुढे जावे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडचा परंपरागत किल्ला लढवावा तर अहमदनगर येथून माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे उमेदवार असल्यास प्रतिस्पर्धी उमेदवारांना चांगली टक्कर देता येईल. 12 माजी मंत्री, तगडे उमेदवार लढल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होईल, भाजपने मंत्री, खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवले तसाच हा प्रयोग व्हावा, अशी मागणी माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगधीया, आर. एम.खान नायडू, ऍड मजिद कुरेशी, अजहर इकबाल आदींच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने दिल्लीत हायकमांडकडे केली आहे.

पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रभारी के.सी.वेणूगोपाल यांची भेट घेत या मंडळींनी ही मागणी केल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या हम है तय्यार.. रॅलीच्या निमित्ताने नागपुरात सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी प्रथमच एकत्रित येणार असल्याने कार्यकर्ते उत्साहात होते. त्याचवेळी राहुल गांधी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढू शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र ऐनवेळी ह्या रॅलीच्या निमित्ताने सोनिया गांधी, प्रियंका गांधी येऊ शकले नाहीत. आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने प्रचाराचा शंखनाद नागपुरात केला तसाच ज्येष्ठ नेत्यांनी स्वतः निवडणुकीत उतरल्यास भाजप विरोधात प्रचाराचा झंजावात विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात निर्माण होऊ शकेल असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.

मात्र, भावनिक बाब सोडली तरी काँग्रेसच्या परंपरागत, सुरक्षित मतदारसंघातून लढणारे राहुल, प्रियंका गांधी खरोखरीच विदर्भातून लढतील का, या प्रश्नाचे उत्तर येत्या काळात मिळणार आहे. गेल्यावेळी वायनाडला राहुल गांधी विजयी झाले तर अमेठीत पराभूत झाले. यावेळी उपेक्षित आदिवासी, तेली समाजाला प्राधान्य द्या, बडे नेते, माजी मंत्री महाराष्ट्रात अधिकाधिक लढल्यास गेल्यावेळी केवळ चंद्रपूरची एकमेव जागा जिंकणाऱ्या काँगेसची परिस्थिती नक्कीच सुधारेल असा दावा माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे कट्टर समर्थक आर.एम.खान नायडू यांनी 'पुढारी' शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT