कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : एस.टी.ला समांतर काम करणारी यंत्रणा म्हणून ओळखण्यात येणार्या आणि ग्रामीण भागात जोरात चालणार्या वडापला एस.टी.ने दिलेल्या विविध सवलतींमुळे मोठा फटका बसला आहे. शहरातून ग्रामीण भागाकडे जाणार्या सर्वच मार्गांवरील वडापच्या वाहनांची संख्या केवळ दहा ते वीस टक्क्यांवर आली आहे. काही वाहनधारक तर वाहन विकून अन्य व्यवसायाकडे वळले आहेत. नव्याने व्यवसाय सुरू केलेले वडापचालक तर खूप अडचणीत आले आहेत.
ग्रामीण भागामध्ये एस. टी. संख्या मर्यादीत असते. त्यांच्या वेळा निश्चित असतात. त्यामुळे एक बस गेली की दुसर्या बससाठी तास, दोन तास प्रतीक्षा करावी लागत असे. काही वेळा बसची फेरी रद्द केली जायची. याचा फायदा उठवत अनेकांनी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. नोकरी मिळत नाही, काही तरुणांनी कर्जे काढून वाहने घेतली. रोज एका वाहनांची भर पडत होती. त्यामुळे गावातील मंदिर, चावडी किंवा सोयीच्या मोकळ्या जागेत झाडाखाली वडापच्या वाहनांच्या रांगा लागू लागल्या. शहरामध्ये संभाजीनगर बस स्थानक, रंकाळा स्टँड, दसरा चौक परिसरात वडापच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळायच्या. परंतु, आता मात्र हे चित्र बदलले आहे.
एस.टी.ने ज्येष्ठ नागरिकांबरोबर महिलांना तिकिटाच्या दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. यामुळे महिला एस.टी. बसनेच प्रवास करू लागल्या. शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे मासिक पास असतात. वीस, पंचवीस किलो मीटरच्या गावांतील तरुण शहराकडे येताना मोटारसायकलचाच सर्रास वापर करतात. त्याचा परिणाम वडापवर झाला आहे. कोल्हापूर शहरातून भोगावती, गारगोटी, कळे, पेठवडगाव, हुपरी, कागल, मलकापूर, बांबवडे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वडाप चालत होते. एस.टी. च्या सवलतींमुळे या मार्गांवरील वडापच्या वाहनांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे.
कळे (ता. पन्हाळा) कडे जाणारी पूर्वी जवळपास शंभर वाहने होती. परंतु, आता केवळ दहा ते पंधरा इतकीच झाली आहेत. अशी परिस्थिती बहुतांशी मार्गांवर झाली आहे. त्यामुळे या व्यवसायातील तरुण आता अन्य व्यवसायाकडे वळू लागले आहेत. हुपरी मार्गावरील वडापमध्ये मात्र फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येते.