ठाणे : पुढारी वृत्तसेवा
शासकीय नोकरभरती करण्याचे काम जेव्हापासून खासगी संस्थांना देण्यात आले आहे तेव्हापासून पेपर फुटीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे यापुढे म्हाडाच परीक्षा घेणार असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारीच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.
त्यानंतर सोमवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या निवास्थानी आंदोलन केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड हे अभाविपच्या कार्यकर्त्यांबरोबरच शासकीय नोकर भरती करणाऱ्या कंपन्यांवर देखील संतापले. पेपर फुटण्याच्या आधीच दक्षता घेऊन आपण परीक्षा रद्द केली, जर पेपरच फुटले नसतील तर मुळात आंदोलन कशासाठी असा प्रश्न आव्हाड यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना केला.
या आंदोलनाचे हसू येत असल्याचे सांगत दुसरीकडे या कंपन्या पेपर फोडण्यासाठीच आल्या असून या कंपन्या फेकून द्यायला पाहिजे असा संताप देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ज्या कंपन्या वर्षानुवर्षे हे काम करत आहेत आणि विशेष म्हणजे राज्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कंपन्या हे काम करत आहेत त्यांचं टेंडर देखील अतिशय कमी आहे. त्यामुळे या सर्व कमान्यांना बाहेर फेकून बँका किंवा इतर स्टाफ सिलेक्शनच्या ज्या परीक्षा असतील त्या परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी समन्वय साधून परीक्षेची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. म्हाडाच्या परीक्षांचे यापुढचे नियोजन म्हाडाच करणार असून यांदर्भात एक बैठक देखील होणार असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचलं का ?