Latest

पृथ्वीराज चव्हाण आज मोठा निर्णय जाहीर करणार?; तर्क- वितर्कांना उधाण

दिनेश चोरगे

कराड; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने चाललेला नाही, मागील 24 वर्षे संघटनात्मक निवडणुका झालेल्या नाहीत यासह विविध मुद्यांवर पक्षाच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका करणारे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद होत आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत बाबींवर कडवट शब्दात उघडपणे भाष्य केल्यानंतर आ. चव्हाण कराडमध्ये प्रथमच प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. त्यामुळेच या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ व निष्ठावंत नेत्यांपैकी एक अशी ओळख असणारे आ.पृथ्वीराज चव्हाण हे पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दोन आठवड्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा देत राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर एका पत्राद्वारे टिकेची जोड उठवली होती. त्याच दिवशी सायंकाळी आ. चव्हाण यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मागील 24 वर्षात काँग्रेस अध्यक्ष पदाचे संघटनात्मक पदांच्या निवडणुका झालेले नाहीत. पक्षात होय बा' संस्कृती वाढत आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा पराभव होत असूनही त्यावर चिंतन होत नाही. सात आमदारांनी पक्षविरोधी भूमिका घेत विधानपरिषद निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले होते. पक्षाशी गद्दारी करणार्‍या आमदारांवर कारवाई होत नाही, अशी खंत व्यक्त करत नामोल्लेख टाळत गांधी घराण्यासह काँग्रेस पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली होती.

त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात नवी दिल्ली येथे महागाई विरोधात एल्गार पुकारण्यात आला होता. यावेळी झालेल्या पदयात्रेचे जाहीर सभेत आ. चव्हाण हे सहभागी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या आंदोलनात सहभागी होत आ. चव्हाण यांनी प्रमाणात तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. गुलाम नबी आझाद यांचीही त्यांनी भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. मागील आठवड्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भारत जोडो पदयात्रा सुरू केली आहे. आ.चव्हाण भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार का, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात होते. आ. चव्हाण यांचे निकटवर्तीय असणारे मनोहर शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत लढवले जाणारे तर्कवितर्क व सुरू असणार्‍या चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ.पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT