Latest

पवार-चव्हाण यांचा प्रीति‘संगम’; कराडमध्ये एकाच कारमधून प्रवास

दिनेश चोरगे

कराड; पुढारी वृत्तसेवा :  राजकीय मतभेद असतानाही सोमवारी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावत एकाच कारमधून प्रवास केला. तसेच या दोन्ही नेत्यात मोठी जवळीक पहावयास मिळाल्याने कराडमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये झालेला प्रीतिसंगम पहावयास मिळाला. खा. शरद पवार कराडात दाखल होताच आ. बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार यांनी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पवारांनी समाधीस्थळी एल्गार पुकारला. शरद पवार जेव्हा प्रीतिसंगमावर दाखल झाले तेव्हा त्यांना समाधीस्थळीपर्यंत आणण्यासाठी एक कार ठेवण्यात आली होती. या कारमध्ये त्यांच्या शेजारी एका बाजूला आ. पृथ्वीराज चव्हाण बसले होते, तर दुसर्‍या बाजूला आ. बाळासाहेब पाटील होते. प्रत्यक्ष समाधीस्थळी शरद पवार जेव्हा दाखल झाले, तेव्हा त्यांनीही पाठीमागे राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना सोबत घेत त्यांच्या हातात स्वतःच्या हातातील पुष्पचक्र दिले.

राष्ट्रवादी विरोधी काँग्रेस नेता ही ओळख दूर

मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील काँग्रेस नेते आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांकडून सातत्याने होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्यातील सुप्त संघर्षामुळे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. एकीकडे हा इतिहास असताना सोमवारी कराडमध्ये घडलेल्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील काँग्रेस नेता अशी पृथ्वीराज चव्हाण यांची असणारी ओळख दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT