Latest

INS Vikrant : ‘आयएनएस विक्रांत’ भारतीय नौदलात दाखल, पंतप्रधानांच्या उपस्थितीत अनावरण

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 'आयएनएस विक्रांत' या युद्धनौकेचे तसेच नवीन भारतीय नौदल ध्वजाचेही अनावरण करण्यात आले आहे. 'आयएनएस विक्रांत' ही पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे. केरळमधील कोची येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडत आहे.

यावेळी पंतप्रधानांनी विक्रांतचे वर्णन विक्रांत विशाल, विराट आणि विहंगम आहे. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत विशेष आहे असे केले. विक्रांत केवळ युद्धनौका नसून ती २१ व्या शतकातील भारताचे कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा पुरावा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पुढे ते बोलताना म्हणाले, केरळच्या सागरी किनाऱ्यावरून प्रत्येक भारतीय एका नव्या भविष्याचा सूर्योदय पाहत आहे. आजचा क्षण हा प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक आहे. त्यामुळे मी भारतीयांना आज शुभेच्छा देतो. आज देशाच्या नव्या आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे  'आयएनएस विक्रांत'. भविष्यातील आव्हांनांना उत्तर म्हणजे 'आयएनएस विक्रांत'. आयएनएस विक्रांतवर होणारा हा कार्यक्रम जागतिक क्षितिजावरील भारताच्या उगवत्या आत्म्याचा जयजयकार आहे. आज भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण आहे, असेही पंतप्रधान नरेद्र मोदींनी म्हटले आहे.

'आयएनएस विक्रांत' वर महिलांनाही संधी:

जेव्हा विक्रांत आपल्या सागरी क्षेत्राच्या रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकही तिथे तैनात असतील. ज्याप्रमाणे समर्थ लहरींना सीमा नसतात, त्याचप्रमाणे भारतातील मुलींनाही सीमा किंवा बंधने नसतात. महासागराची अफाट शक्ती आणि स्त्री शक्ती, ही नव्या भारताची उदात्त ओळख बनत आहे. त्यामुळे पूर्वी जे महिलांसाठी निर्बंध होते ते आता हटवले जात आहेत.  आता भारतीय नौदलाने महिलांसाठीही आपल्या सर्व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

नौदलाचा नवीन ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

नवीन सूर्य की नई प्रभा, नमो, नमो। नमो स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो, नमो… असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे नवीन ध्वजाचेही अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात केले. यानंतर नौदलाचा हा नवा ध्वज नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करण्यात आला.  यावेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि इतर मान्यवर येथे उपस्थित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT