Latest

काशी-तामिळनाडूचे नाते भावनिक : पंतप्रधान मोदी

दिनेश चोरगे

वाराणसी; वृत्तसंस्था : काशी आणि तामिळनाडूचे संबंध भावनात्मक व रचनात्मक असल्याचे सांगतानाचा तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे महादेवाच्या एका घरातून दुसर्‍या घरात येण्यासारखे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. त्यांच्या हस्ते काशीमध्ये 19 हजार 155 कोटी रुपयांच्या 37 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणादरम्यान प्रथमच एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि उपस्थितांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला.

उपस्थित तमिळी बांधवांना उद्देशून ते म्हणाले, काशीची जनता तुमच्या सर्वांच्या सेवेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. जेव्हा तुम्ही येथून निघाल, तेव्हा बाबा काशी विश्वनाथ यांच्या आशीर्वादासह तुम्ही काशीची चव, काशीची संस्कृती आणि काशीच्या आठवणीही सोबत घेऊन जाल. यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. जमावाने 'जय श्री राम' आणि 'हर हर महादेव'च्या घोषणा दिल्या. यानंतर पंतप्रधानांनी छोटा कटिंग मेमोरियल ग्राऊंडवर आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन योजनेबाबत महिलांशी चर्चा केली.

खासदार या नात्याने उपस्थित

पंतप्रधान म्हणाले, विकास भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी देशातील सर्व जनता वेळ देत आहे. त्यामुळे वाराणसीचा खासदार या नात्याने या कार्यक्रमाला वेळ देणे ही माझी जबाबदारी होती. आज मी खासदार म्हणून, तुमचा सेवक म्हणून या प्रवासात सहभागी होण्यासाठी आलो आहे.

विकास भारत संकल्प यात्रा माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. मी काय बोललो होतो आणि मी जे काम करत होतो, ते माझ्या मनाप्रमाणे घडले की नाही, जे व्हायला हवे होते त्यासाठी घडले की नाही हे मला तुमच्या तोंडून ऐकायचे होते. प्रत्येक व्यक्तीला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. जेव्हा एखादा गरीब माणूस म्हणतो की, त्याच्या घरातून गरिबी हटवली आहे, ही मोठी गोष्ट आहे. यावेळी मोदी यांनी शाळकरी मुलांशी संवाद साधला. जे झोपडपट्टीत राहतात, अशांनाच पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. केंद्रात आमचे सरकार आल्यानंतर आतापर्यंत चार कोटी कुटुंबांना घरे मिळाली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

जगातील इतर देशांमध्ये राष्ट्र ही राजकीय व्याख्या आहे. मात्र, भारत हा राष्ट्र म्हणून आध्यात्मिक श्रद्धेने बनलेला आहे. आदि शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्यासारख्या संतांनी भारत एकसंध केला असून, त्यांनी आपल्या प्रवासातून भारताची राष्ट्रीय जाणीव जागवली. विविधतेतील एकता हीच भारताची खरी ताकद आहे. त्यामुळेच अगदी अलीकडेच जी-20 शिखर परिषदेदरम्यान भारताची ही विविधता पाहून सारे जग थक्क झाले, याचा मोदी यांनी विशेष उल्लेख केला. दरम्यान, पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर गेल्या 9 वर्षांत मोदी यांची ही 43 वी वाराणसी भेट आहे. यावेळी ते 55 तास म्हणजे सोमवारीही वाराणसीतच राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या भाषणात प्रथमच एआयचा वापर

काशी-तमिळ संगमच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन करतेवेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांनी हिंदीतून भाषण केले व एआयच्या माध्यमातून त्याचा तमिळी भाषेतील अनुवाद उपस्थित तमिळी बांधवांना ऐकवण्यात आला. लोकांनी याचे जोरदार स्वागत केले. मोदी म्हणाले, एआय तंत्रज्ञानाचा माझ्या भाषणात आज प्रथमच वापर करण्यात आला. यामुळे मला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल.

मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेला दिला रस्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत दाखल झाल्यानंतर त्यांचा ताफा रोड शोच्या स्वरूपात विमानतळापासून 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटा कटिंग मेमोरियल मैदानावर पोहोचला. यावेळी पंतप्रधानांच्या ताफ्याने रुग्णवाहिकेलाही रस्ता दिला. वास्तविक, रुग्णवाहिका ताफ्याच्या मागे धावत असताना ताफ्यातील मुख्य वाहनाकडून संदेश गेला आणि तातडीने रुग्णवाहिकेला रस्ता देण्यात आला. त्यानंतर मोदींचा ताफा पुढे सरकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT