पुढारी ऑनलाईन: ठाण्यातील मानपाडा भागातील आयसीआयसीआय बँकेतून 12 कोटी रुपयांच्या रोकड चोरीतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अडीच महिन्यांहून अधिक काळानंतर पुण्यातून अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. अल्ताफ शेख (वय 43) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे नऊ कोटी रुपये जप्त केले आहेत.
सोमवारी अल्ताफ शेख अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत त्याची बहीण नीलोफरसह पाच आरोपींना अटक केली आहे. ही चोरी 12 जुलै रोजी झाली होती. "मुंब्य्रातील रहिवासी असलेला शेख हा आयसीआयसीआय बँकेत कस्टोडियन म्हणून काम करत होता. कस्टोडियन म्हणून तो बँकेच्या लॉकरच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडे होती. चोरी करण्यापूर्वी त्याने नियोजन व यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास आणि साधने गोळा करण्यात वर्ष घालवले असे, मानपाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासादरम्यान, पोलिसांना आढळून आले की, शेखने याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पैसे टाकण्यासाठी एसी डक्ट मोठा केला होता. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करून संपूर्ण चोरीची योजना आखली होती.
"अलार्म सिस्टीम निष्क्रिय केल्यानंतर आणि सीसीटीव्हीत छेडछाड केल्यानंतर, शेखने बँकेची तिजोरी उघडली आणि डक्टमधून रोकड हस्तांतरित केली. सिक्युरिटी मनी गहाळ झाल्याचे बँकेच्या लक्षात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर सीसीटीव्हीच्या डीव्हीआर तपासणी करण्यासाठी बँकेने तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केले.
या घटनेनंतर शेख फरार झाला. तो सतत वेष बदलायचा आणि ओळख लपवण्यासाठी बुरखा वापरायचा. शेखची बहीण नीलोफर हिला त्याच्या हालचालीची माहिती होती, तिने काही रोख रक्कम घरात लपवून ठेवली होती. या प्रकरणात तिच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अखेर सोमवारी शेखला पुण्यातून अटक करण्यात आली. बँकेतून चोरीला गेलेल्या 12.20 कोटी रुपयांपैकी सुमारे नऊ कोटी रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आणि उर्वरित रक्कम लवकरच वसूल केली जाईल, असे ते म्हणाले. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अल्ताफ शेख याला अटक करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी नीलोफर आणि अबरार कुरेशी (वय ३३), अहमद खान (वय ३३) आणि अनुज गिरी (वय ३०) या तिघांना अटक केली होती. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.