नवी दिल्ली ः हिंदी वैविध्यपूर्ण भाषा असून सर्व भारतीय भाषांची प्रचिती हिंदी भाषेत येते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणाले की, जगातील विविध भाषांसह भारतातील प्रादेशिक भाषा आणि उपभाषेंचा हिंदी भाषेने आदर केला आहे. हिंदीमध्ये भाषेने देशातील भाषांसोबत कधीही स्पर्धा केली नाही. उलट हिंदीमुळे स्थानिक भाषांना बळकटी मिळत आहे.
स्वातंत्र्यलढ्यातही हिंदी भाषेने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावरही हिंदीचा सन्मान झाला आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये हिंदी भाषेचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संयुक्त राष्ट्र संघामध्येही हिंदीचा वापर करण्याबाबत भारताने आग्रही भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.