छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : येत्या दीड महिन्यात देशात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या जातील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आम्ही भाजपविरोधात लढू आणि आमचे उमेदवार उभे करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अॅड. आंबेडकर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या दीड महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, असे त्यांनी सांगताच पत्रकारांनी हे कसे शक्य आहे, असे त्यांना विचारले. यावर त्यांनी सांगितले की, दीड महिन्यानंतर माझे म्हणणे खरे असल्याचे तुम्हाला दिसून येईल. आम्ही आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. महाविकास आघाडीशी आमच्या वंचित बहुजन आघाडीचा कसलाही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आमची आघाडी फक्त शिवसेनेसोबत आहे.