नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील मुलांमध्ये समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य दिशा दाखविणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज असामान्य कामगिरीसाठी १९ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील तरुणांना सक्षम बनवायचे आहे. त्यासाठी त्यांना नवोपक्रम आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. आजची मुले टेक्नोसॅव्ही आहेत. ते त्यांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात मात्र तंत्रज्ञानाचाही अनेकदा गैरवापर होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, आज अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, हा ऐतिहासिक दिवस आहे. धीर धरणे, मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, सर्वांना सोबत घेणे, संकटसमयी धैर्याने वागणे, सदैव शिष्टाचार लक्षात ठेवणे आणि सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणे हे सर्व प्रभु श्रीरामाचे आदर्श आहेत, असेही त्या म्हणाल्या.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान समारंभात असामान्य कामगिरीसाठी १९ बालकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शौर्य क्षेत्रात १, कला आणि संस्कृती क्षेत्रात ७, नवोन्मेष क्षेत्रात १, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात १, समाजसेवा क्षेत्रात ४ आणि क्रीडा क्षेत्रात ५ अशा १९ बालकांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये ९ मुले आणि १० मुली आहेत.
शौर्य : आदित्य ब्राह्मणे, मरणोत्तर (महाराष्ट्र)
कला आणि संस्कृती: अनुष्का पाठक (उत्तर प्रदेश), अरिजित बॅनर्जी (पश्चिम बंगाल), अरमान उबरानी (छत्तीसगड), हेतवी कांतीभाई खिमसुरीया (गुजरात), इशफाक हमीद (जम्मू काश्मीर), मोहम्मद हुसैन (बिहार), पेंड्याला लक्ष्मी प्रिया (तेलंगणा)
नवोन्मेष : सुहानी चौहान (दिल्ली)
विज्ञान आणि तंत्रज्ञान : आर्यन सिंह (राजस्थान)
समाजसेवा : अवनिश तिवारी (मध्य प्रदेश), गरिमा (हरियाणा), ज्योत्स्ना अख्तर (त्रिपुरा), संजय मजुमदार (आसाम)
क्रीडा : आदित्य यादव (उत्तर प्रदेश), चार्वी ए. (कर्नाटक), जेसिका नेई सरिंग (अरुणाचल प्रदेश) लिंथोई चनंबम (मणिपूर), आर. सूर्यप्रसाद (आंध्रप्रदेश)
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (२३ जानेवारी २०२४) प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई हे देखील यावेळी उपस्थित राहतील.