भांडुप; पुढारी वृत्तसेवा : भांडुपच्या व्हिलेज येथील सुषमा स्वराज पालिका प्रसूती गृहातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात प्रसूतीच्या दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाल्याने डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशात गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची वेळ आली. यामध्ये एका गर्भवती महिलेवर सीझर करताना नवजात शिशुचा मृत्यू झाला. तर सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास नेत असताना उपचारादरम्यान त्य मातेचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून संपात व्यक्त करण्यात आला आहे.
सहीदुन खुसुरुद्दीन अंसारी (वय २६रा. हनुमान नगर, मुलुंड) या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने सोमवार (दि २९) त्यांना भांडुप येथील पालिकेच्या सुषमा स्वराज रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे सकाळपासून त्यांच्यावर उपचाराचं झाले नाहीत. असा आरोप नातेवाईकानी केला आहे. उलट रात्री उशीरा तब्येत आणखी बिघडल्यावर डॉक्टरांनी त्यांचे सीझर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सुरू असतानाच रुग्णालयाचा वीज प्रवाह खंडित झाला. यावेळी रुग्णालात पर्यायी व्यवस्था देखील नव्हती. अश्या वेळी अवघ्या टॉर्चच्या आधारे डॉक्टरांनी त्यांचे ऑपरेशन केले. मात्र, यामध्ये मुल दगावले आणि मातेचा ही मृत्यू झाला.
ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना नाही. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तसेच, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे याच भांडुप परिसरामध्ये सावित्रीबाई प्रसूती गृहाचे स्थलांतर हे या सुषमा स्वराज पालिका रुग्णालयात करण्यात आले होते.
सावित्रीबाई पालिका रुग्णालयात आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच विविध कारणांमुळे आतापर्यंत अनेक लहान मुले तसेच गर्भवती महिला दगावल्याच्या घटना समोर आल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सुषमा स्वराज पालिका रुग्णालयात अशा घटना होत असल्यामुळे या संपूर्ण आणि व्यवस्थापनावर कार्यवाही करावी अशी मागणी आता स्थानिक माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी केली आहे. या बाबत पालिका प्रशासनाकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली असून या घटनेची चौकशी केली जाणार आहे. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.