श्रीनगर, वृत्तसंस्था : निलंबित जिल्हा पोलिस अधीक्षक शेख आदिल मुश्ताक यांना टेरर फंडिंगच्या एका प्रकरणात 5 लाख रुपयांची लाच घेऊन दहशतवाद्यांना सोडून देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. याआधीही शेख आदिल यांच्याविरुद्ध महिलांना ते ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप झाला होता.
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या मुजम्मिल जहूर याच्याकडून शेख आदिल यांनी 5 लाख रुपये लाच घेतली होती. अन्य एका पोलिस अधिकार्याची फसवणूक केल्याचाही शेख आदिल यांच्यावर आरोप आहे. आदिल हे मुजम्मिलच्या सतत संपर्कात होते. त्याला एका टेरर फंडिंग प्रकरणात वाचविण्याच्या प्रयत्नात होते. आदिल आणि मुजम्मिलदरम्यान टेलीग्राम वरील चँटिंगचे तसेच 40 कॉलिंगचे रेकॉर्डही पोलिसांकडे उपलब्ध झाले आहे.
चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यात टेरर फंडिंग प्रकरणात पोलिसांनी लश्कर-ए-तय्यबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 31 लाख रुपये जप्त केले होते. चौकशीदरम्यान मुजम्मिल जहूर याचे नाव समोर आले होते. मुजम्मिलचा शोध सुरू असतानाच त्याने प्रकरणाच्या तपासाधिकार्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा मजकूरही पोलिस अधीक्षक शेख आदिल यांनी लिहिल्याचे समोर आले आहे. मुजम्मिलला अटकेपासून वाचविण्यासाठी आदिल त्याला कायदेशीर सल्लेही देत होता. न्यायालयाने आदिलला 6 दिवस पोलिस कोठडी दिली आहे.