Latest

ए. एस. ट्रेडर्स प्रकरण : पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड चौकशी अहवाल अधीक्षकांकडे

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शाहूपुरी येथील बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह विविध कंपन्यांमधील फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे शनिवारी सादर करण्यात आला.

संबंधित अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे, असे पंडित यांनी पत्रकारांना सांगितले. कृती समितीने गायकवाड यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभुमीवर चौकशी अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांची नियुक्ती करण्यात आली होती. दीड महिन्यांच्या चौकशीनंतर अहवाल सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यातील जेरबंद संशयित राजेश पाडळकर याचा विश्वासू साथीदार सुभाष गणपती पाटील (रा. पाचगाव, ता. करवीर) याच्या अटकेसाठी पथकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. संशयिताने बंगळूरला पलायन केल्याची माहिती पुढे आली आहे. बंगळूर येथील पोलिस यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तथा तपासाधिकारी रवींद्र कळमकर यांनी दिली.

दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांसह एजंटांनी सुमारे एक लाख 85 हजारावर गुंतवणूकदारांना सुमारे साडेतीन हजारांवर कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदारसह संचालक व एजंटांविरुद्ध गतवर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

स्वाती यांनी संशयितांना मदत केल्याची तक्रार

कृती समितीने स्वाती गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत काही संशयित आरोपींना तपासात मदत केल्याचा आरोप केला होता. आरोपांची दखल घेत पोलिस अधीक्षक पंडित यांनी सुवर्णा पत्की यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT