Latest

लोहगड किल्ल्यावरील प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोड मध्ये

अमृता चौगुले

लोणावळा : गत आठवड्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे त्याठिकाणी झालेले पर्यटकांचे हाल आणि उदभवलेल्या नाजूक परिस्थितीमुळे खडबडून जागे झालेले पोलीस, पुरातत्त्व आणि वन खाते ऍक्शन मोड मध्ये आले आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या असून तशा सूचना पारित करण्यात आल्या आहे.

मागील आठवड्यात उद्भवलेल्या परिस्थितीची गंभिर दखल घेत या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासोबत तसेच वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कार्ला ते लोहगड दरम्यान पाहणी करत एक अँक्शन प्लॅन तयार करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्यासह लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, खंडाळा महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अरूण डोंबे, कार्ला, भाजे, मळवली, लोहगड या गावांचे सरपंच व पोलीस पाटील तसेच भारतीय पुरात्तव विभागाचे निकांत कुमार हे उपस्थित होते.

या पाहणी नंतर संयुक्तपणे काही निर्णय घेण्यात आले असून यात प्रामुख्याने कोणी कोणी काय काय करायचे याचं नियोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवारची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या हातगाड्या व इतर अतिक्रमण काढून घेणे, पर्यटन स्थळांच्या अगदी जवळ तसेच मुख्य चौकात आणि अरुंद ठिकाणी नो पार्किंग व पोलीस सूचनेप्रमाणे वळणमार्ग अर्थात डायव्हर्षन बोर्ड लावणे, वाहन चालकांना सुचना देण्याकरिता पी.ए. स्टिटम लावणे, रोडच्या दोन्ही बाजूने वाहन पार्किंग होणार नाही याकरीता पांढरे पट्टे मारणे, कार्ला फाटा येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे व शनिवार व रविवार या गर्दीचे दिवशी प्रत्येकी 5 स्वयंसेवक वाहतुक व्यवस्थापनाकरीता पोलिसांना उपलब्ध करून देणे आशा सुचना संबंधित सर्व ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कार्ला फाटा येथे गर्दी होवू नये याकरीता मळवली बाजूकडून येणारी वाहने ही कार्ला गावातून मुख्य हायवे रोडला पाठविण्यात येणार आहेत. कार्ला ते मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील अरूंद पुलावर वाहतुक कोंडी होवू नये याकरीता दोन्ही बाजुस पोलीस व पोलीस मित्र यांची नेमणुक करून टप्या टप्याने दोन्ही बाजुकडील वाहने सोडण्यात येणार आहे. भाजे गावाकडून येणारी वाहतुक ही मळवली रेल्वे गेटच्या पुर्वीच देवले गावाकडे वळवून देवले ओढे- औंढोली या मार्गाने नवीन पुणे मुंबई हायवे रोडवर पाठवून एकेरी वाहतुक करण्यात येणार आहे.

लोहगड येथे लोहगड किल्ला पाहाण्यासाठी मोठया प्रमाणावर पर्यटक येत असल्याने सदर ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये याकरीता भाजे गवाकडून लोहगडाकडे गेलेली वाहने ही परिस्थितीप्रमाणे दुधिवरे खिंड मार्गे लोणावळा बाजूकडे पाठवली जाणार आहे. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी गडावरील गर्दीची माहिती देणेकरीता भारतीय पुरातत्व विभागाकडून एल.ई.डी. स्क्रिन लावणे, सुरक्षारक्षक वाढविणे, प्रत्यक दरवाजाचे ठिकाणी सुरक्षारक्षक व पी. ए. सिस्टम ठेवणे. गडावर पी.ए. सिस्टम ठेवणे गडावर जाण्याकरीता तिकीट विक्री करताना त्यावर गडावर थांबण्याचा वेळ नमुद करणे, गडावरील सर्व पर्यटक सायंकाळी 5 वा. चे पुर्वी खाली येतील याची दक्षता घेणे, गडावर जाण्यासाठी ज्या ठिकाणी पायऱ्या तुटल्या आहेत. त्या दुरूस्त करणे, सुक्षारक्षक यांना एकमेकांसोबत संपर्क करण्याकरीता वॉकीटॉकीची व्यवस्था करणे, गडावर असणारे धार्मीक स्थळाचे ठिकाणी स्वतंत्र सुरक्षा रक्षकाची नेमणुक करणे, गडावर असलेल्या धोक्याचे ठिकाणी प्रवेश बंद करणे इत्यादी सुचना भारतीय पुरातत्व विभाग यांना देण्यात आल्या आहेत.

पर्यटकांनी लोहगडावरून भाजेमार्गे परत येत असताना मळवली, देवले, औंधे या मार्गाचा वापर करावा तसेच पर्यटकांनी पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून दिलेल्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे आवाहन लोणावळा विभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.

पावसाळी पर्यटनासाठी यापूर्वी लोणावळा शहराला पसंती देण्याऱ्या पर्यटकांनी सध्या शहराच्या आजूबाजूला असलेल्या कार्ला, मळवली, भाजे, लोहगड, विसापूर, पवना, तुंग, तिकोना, राजमाची याकडे आपला मोर्चा वळवला आहे. पावसाळ्यातील जवळपास प्रत्येक विकेंडला पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी असते. मात्र यामुळे अनेकदा कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होतो. पोलीस प्रशासन दरवर्षी यावर मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना अमलात आणत असतात. मात्र दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात नव्याने अनेक अडचणी समोर येत राहतात. त्याचप्रमाणे यावर्षी पावसाळी पर्यटनाच्या हंगामातील खऱ्या अर्थाने पहिल्याच आठवड्यात लोहगडावर झालेली तुफान गर्दी आणि त्याठिकाणी चार तासाहून अधिक काळ अडकलेल्या पर्यटकांचे हाल प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरावे अशी अपेक्षा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT