सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील तांबोळे रोडवर असलेल्या केमिकल कंपनीमध्ये जिप्सम पावडर ( poisoning ) गाडीतून उतरवत असताना त्या पावडरच्या संपर्कात आल्याने 12 कामगारांना श्वसनाचा त्रास होऊन चक्कर व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली.
रेश्मा सचिन जाधव (वय 21, रा. कोळेगाव, ता. मोहोळ), पुजा सुरेश शिंदे (वय 16), रेश्मा सुनिल पवार (वय 23), उषा सुनील पवार (वय 32), सुरेखा रवी जाधव ( वय 27), सपना मिथुन पवार (वय 20), सविता युवराज शिंदे (वय 17), प्रियांका रवी जाधव (वय 10), अंजली विक्रम पवार (वय 20), कल्पना रमेश शिंदे (वय 25), रेखा सुनिल पवार (वय 30) अशी अत्यवस्थ असलेल्या महिलांची नावे असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. ( poisoning )
तांबोळे रोड वरील मोहोळ पासून दोन किलोमीटर अंतरावर निर्मल केमिकल हा खताचा कारखाना आहे. या कारखान्यांमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गाडीतून जिप्सम पावडर खाली करण्यात येत होती. त्यावेळी त्या पावडरच्या संपर्कात आलेल्या वरील सर्व कामगारांना काही वेळानंतर चक्कर व उलट्यांचा त्रास होऊ लागला. तसेच त्यांना श्वास घेण्याची त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना सचिन जाधव यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाणे, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन कामगारांची विचारपूस करून त्यांना उपचारासाठी सहकार्य केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.