तेहरान: वृत्तसंस्था : डिसेंबर २०२२ पासून इराणमध्ये अनेक शाळकरी मुली आजारी पडत आहेत. विद्यार्थिनींनी अभ्यास करू नये म्हणून त्यांच्यावर कट्टरतावाद्यांकडून रासायनिक हल्ला तसेच विषप्रयोग झाल्याचे सांगण्यात येते. कट्टरतावाद्यांकडून शाळांच्या मुख्य पेयजल कुंभांतून पाण्यात घातक रसायने त्यासाठी मिसळली गेली. हे पाणी प्यायल्याने शेकडो विद्यार्थिनी एकापाठोपाठ एक रुग्णालयांतून दाखल झाल्या आहेत.
काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात महिलांचे केस धरून पोलिस त्यांना ओढतच अटक करत असल्याचे दिसत आहे. या महिला रुग्णालयात दाखल विद्यार्थिनींच्या माता असल्याचे सांगण्यात येते. डिसेंबर २०२२ मध्ये विद्यार्थिनी आजारी पडत असल्याप्रकरणी पालकांनी आंदोलन केले होते. त्यावरून चौकशीचे आदेश देण्यात आले, प्रत्यक्षात मात्र त्याला ३ महिने उलटून कुणालाही अटक झालेली नाही. संतप्त पालकांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिसांनी या पालकांनाच अटक केली.